औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेली काही वर्षे कॅन्सर रुग्णांवर मोठय़ा प्रमाणात उपचार करण्यात येत असून केंद्र शासनाने येथे १२० कोटी रुपयांच्या ‘स्टेट कॅन्सर इन्स्टिटय़ूट’च्या उभारणीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. दिल्ली येथे गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत केंद्राने आपल्या वाटय़ाची रक्कम तात्काळ उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. यातून कॅन्सर रुग्णांसाठी अत्याधुनिक यंत्रणा तसेच वाढीव बेड व अतिदक्षता विभाग उभारण्यात येणार आहे.

परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. टाटा रुग्णालयातील खाटा व डॉक्टरांची संख्या आणि येणारे रुग्ण यांचे प्रमाण  व्यस्त असून राज्यात महसूल विभागनिहाय सुसज्ज कॅन्सर उपचार व्यवस्था निर्माण करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यानुसार औरंगाबाद, नागपूर, पुणे, अकोला, सांगली तसेच मुंबईतील कामा रुग्णालयात सुसज्ज कॅन्सर उपचार व्यवस्था सुरू  करण्याची योजना आखली आहे. तथापि मराठवाडय़ात वाढत्या कर्करुग्णांची संख्या लक्षात घेऊन औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यमान कॅन्सर उपचार विभागाला स्टेट कॅन्सर इन्स्टिटय़ूटचा दर्जा देण्याचा निर्णय १५ ऑक्टोबर २०१६ रोजी राज्य शासनाने घेतला. २०१२ पासून औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठय़ा प्रमाणात कॅन्सर रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. यासाठी टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या मदतीतून डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले तसेच भाभाट्रॉन मशीनही तेथे बसविण्यात आले.

सध्या या रुग्णालयात कॅन्सर रुग्णांसाठी शंभर खाटा असून केंद्र व राज्य यांच्या समन्वयातून ‘स्टेट कॅन्सर इन्स्टिटय़ूट’ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प १२० कोटी रुपयांचा असून यात केंद्राचा वाटा साठ टक्के तर राज्याचा वाटा चाळीस टक्के राहणार असून याअंतर्गत १६५ खाटांची व्यवस्था असलेली इमारत उभी करण्यात येणार आहे. गेल्या आठवडय़ात केंद्राच्या प्रतिनिधींसमवेत वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयांच्या डॉक्टरांची एक बैठक झाली असून येत्या काही दिवसांत केंद्राचा वाटा राज्याला उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

नागपूरमध्ये संस्थेची उभारणी

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही आगामी काळात ‘स्टेट कॅन्सर इन्स्टिटय़ूशन’ची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या येथे राज्य शासनाने ४५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले असून रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्याचे काम सुरू आहे. नागपूर, विदर्भ व लगतच्या जिल्ह्य़ातील कॅन्सर रुग्णांसाठी टर्शरी कॅन्सर सेंटरची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.