संदीप आचार्य 
मुंबई : राज्यातील हजारो रुग्णांना आज ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जीवनदायी ‘ ठरली आहे. करोना काळात ज्या वेळी केवळ खासगीच नव्हे तर पालिका व शासकीय रुग्णालयातही सामान्य रुग्णांवर उपचार करणे टाळले जात होते तेव्हापासून म्हणजे एप्रिल ते २५ सप्टेंबरपर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून तब्बल अडीच लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यात ८४ हजार कॅन्सर रुग्णांचा समावेश आहे तर हृदयविकाराचा त्रास झालेल्या २९ हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

करोनाच्या गेल्या सहा महिन्यात कॅन्सर रुग्ण, गर्भवती महिला तसेच हृदयविकाराच्या रुग्णांसह वेगेवेगळ्या शस्त्रक्रियांसाठीच्या रुग्णांचे अतोनात हाल झाले. याशिवाय करोना रुग्णांनाही रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी खूप धडपडावे लागले. याच काळात महात्मा फुले जन आरोग्य योजनेने २३ मे रोजी सर्वप्रथम आदेश काढून रुग्णोपचाराची व्याप्ती वाढवली. यापूर्वी पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. तो वाढवून पांढरी शिधापत्रिका असलेल्यांचाही समावेश या योजनेत केल्यामुळे राज्यातील तब्बल १२ कोटी लोक योजनेचा लाभ घेऊ शकत होते.

यापूर्वीच्या योजनेत केवळ ४४० रुग्णालयातच उपचार मिळण्याची व्यवस्था होती. ती वाढवून १००० रुग्णालयात एकूण ९९६ प्रकारच्या आजारांवर उपचार घेण्याची तरतूद केली गेली. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या योजनेत ज्या आजारांचा फारसा लाभ रुग्णांनी घेतला नाही ते आजार बदलून रुग्णोपयोगी आजारांचा नव्याने समावेश करण्यात आला. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना चालविण्यात येत असून या योजनेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी करोना काळात गर्भवती महिलांच्या बाळंतपणासह आवशयक ६७ प्रकारच्या चाचण्या व उपचाराचाही या योजनेत नव्याने समावेश केला. त्याचा फायदा २५ हजाराहून अधिक महिलांना बाळंतपणासाठी मिळाला. याशिवाय महापालिका व शासकीय रुग्णालयात गुडघेबदलासह १२० आजारांचा योजनेत समावेश करण्यात आला.

करोना काळात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील १००० रुग्णालये करोना रुग्णांसह सामान्य रुग्णांवर व्यवस्थित उपचार करतील याची काटेकोर काळजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी घेतल्यामुळे २५ हजार गर्भवती महिला व्यतिरिक्त सुमारे अडीच लाख रुग्णांवर गेल्या पाच महिन्यात उपचार होऊ शकले. यात कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. करोनाच्या मागील काही महिन्यात टाटा कॅन्सर रुग्णालयातही साधारणपणे नियमित कामाच्या ४० टक्केच काम होत होते. त्यामुळे कॅन्सर रुग्णांचा एक मोठा वर्ग महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या रुग्णालयांकडे वळला. यात केमोथेरपी अन्य तपासण्या व संदर्भात उपचाराचा लाभ ६७,५४७ रुग्णांनी घेतला.

एकूण ६७०६ कॅन्सर रुग्णांच्या शस्त्रक्रिया पार पडल्या तर ९८४७ रुग्णांवर रेडिएशनचे उपचार झाले. याशिवाय हृदयविकाराच्या २७२३८ रुग्णांवर उपचार करण्यात येऊन २५२५ ह्रदरुग्णांवर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्या. करोना काळात मूत्रपिंड विकार व त्यातही डायलिसीसच्या रुग्णांचे मोठे हाल झाले. या योजनेमुळे तब्बल ४४३७८ किडनी विकार रुग्णांना उपचार मिळू शकले. स्त्रियांच्या वेगवेगळ्या आजारावरील उपचाराची संख्या २२९३५ एवढी आहे. एकूण ९३०७ लहान मुलांवर उपचार करण्यात आले तर १२६६ लहान मुलांच्या शस्त्रक्रिया या योजनेत केल्या गेल्या. याशिवाय अपघात किंवा अन्य कारणांमुळे हाडं मोडलेल्या ६३४९ रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या तर ६२९२ सामान्य रुग्णांच्या शस्त्रक्रिया करोना काळात पार पडल्या. ३५५८ मेंदु शस्त्रक्रिया मागील पाच महिन्यात करण्यात आल्या असून करोना व्यतिरिक्तच्या वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना वरदान ठरली आहे.

मानसिक आजारापासून वेगवेगळ्या आजारांवर या योजनेतील हजारभर रुग्णालयातून उपचार घेण्यात आले असून डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितलेल्या अडीच लाखां व्यतिरिक्त आणखीही खूप मोठ्या संख्येने या योजनेत उपचार झाले आहेत. विमा योजनेकडे पोहोचलेली व मंजूर प्रकरणांचीच केवळ ही संख्या असून महापालिका तसेच अनेक खासगी रुग्णालयांना उपचार केलेल्या रुग्णांचे विम्यासाठीचे अर्ज पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने भरता आलेले नाहीत. यात करोना रुग्णांची संख्याही मोठी असून सेव्हन हिल्स, महापालिका रुग्णालये यात सामान्य रुग्ण व करोना रुग्णांवर अहोरात्र उपचार सुरु आहेत. या सर्व ठिकाणी रुग्णांकडून एक रुपयाही घेतला जात नसला तरी विमा योजनेकडे या रुग्णांची कागदपत्रे सादर झालेली नाहीत. यामागे या रुग्णालयातील सर्वजण करोना वरील उपचारात व्यस्त आहेत हेच त्याचे उत्तर असल्याचे पालिकेतील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. आज घडीला महात्मा फुले योजनेत अडीच लाख रुग्णांवर उपचार झाले ही अधिकृत आकडेवारी असून प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी जास्त रुग्णांवर उपचार झाल्याचे योजनेच्या एका अधिकार याने सांगितले.