मुंबई : मंत्रालयातील एका विभागातील आयएएस महिला अधिकारीला करोनाचा संसर्ग झाला असून प्रकृती गंभीर असल्याने रक्तद्रव उपचार (प्लाझ्मा थेरपी)दिले आहेत. रक्तद्रव उपचार दिलेल्या या शहरातील चौथ्या रुग्ण आहेत.

परराज्यातील मजुरांचे नियोजन करण्यासाठी नियुक्त केलेल्या या आयएएस अधिकाऱ्याला करोनाची बाधा झाल्याचे ७ मेला निदान झाले. त्यानंतर काहीच दिवसांत प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ब्रीचकॅण्डी रुग्णालयात दाखल केले. ऑक्सिजन व्यवस्थेवर असून आयसीएमआरने सूचित केलेल्या विविध औषधांना त्या विशेष प्रतिसाद देत नव्हत्या. प्रकृती अधिकच खालावत असल्याने त्यांना रक्तद्रव उपचार देण्याचा निर्णय घेतला गेला. ब्रीचकॅण्डी रुग्णालयात १६ मेला त्यांच्यावर ही उपचारपद्धती केली असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देण्यास रुग्णालय प्रशासनाने मात्र नकार दिला आहे. रुग्णालयाने करार करत दया तत्त्वावर ही उपचारपद्धती दिल्याचे समजते. करोना उपचारातील प्रभावशाली औषध मानले जाणारे रेमदेसीवीरही त्यांना दिल्याचे समजते.

शहरात रक्तद्रव उपचार सर्वात आधी लीलावती रुग्णालयात ५३ वर्षीय व्यक्तीवर दिले गेले. त्याचा दोनच दिवसानंतर मृत्यू झाल्यामुळे या उपचार पद्धतीबाबत अनेक चर्चा त्यावेळी सुरू झाल्या होत्या.

रक्तद्रव उपचार देण्यासाठी वैद्यकीय चाचण्याअंतर्गत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे(आयसीएमआर) नोंदणी करून परवानगी घेणे गरजेचे आहे. राज्यात सध्या आठ रुग्णालयांना आयसीएमआरने परवानगी दिली असून मुंबईतील नायर, कस्तुरबा आणि एच.एन.रिलायन्स फाऊंडेशनचा यात समावेश आहे.

नायरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

नायर रुग्णालयात आत्तापर्यंत ३५ ते ४० वयोगटांतील दोन रुग्णांना ही उपचारपद्धती दिलेली असून दोन्ही रुग्णांमध्ये सुधारणा झालेली आहे. यातील एका रुग्णाला आता घरीदेखील सोडण्यात येईल, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.