डी. एन. नगर ते मानखुर्द मार्गिकेच्या दुभाजकांवरील वृक्षांना जीवदान

मुंबईत मेट्रो मार्गिका प्रकल्पांच्या कामाचा सपाटा एकीकडे सुरू झालेला असताना त्यासाठी मोठय़ा संख्येने वृक्षांची तोड करण्यात येत आहे. मात्र मेट्रोच्या बांधकामाआड येणाऱ्या वृक्षांना दत्तक घेण्याची मोहीम सुरू होणार आहे. मुळासकट काढण्यात येणाऱ्या वृक्षांना यामुळे जीवदान मिळणार आहे. ‘मेट्रो-२ बी’ या डी. एन. नगर ते मानखुर्द या मार्गिकेच्या कामाला सुरुवात होणार असल्याने येथील रस्त्यांच्या दुभाजकांवर असणाऱ्या वृक्षांना दत्तक घेण्याची मोहीम राबविली जाणार आहे. मेट्रो प्रकल्पांमुळे वृक्षांवर कुऱ्हाड मारली जात आहे. मात्र ‘मिशन ग्रीन मुंबई’ पर्यावरणवादी संस्थेने मेट्रो प्रकल्पातील अधिकाऱ्यांचा मदतीने वृक्षांचे संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

महत्त्वाच्या वाहतूक मार्गावर मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर रस्त्यांच्या दुभाजकावर असणाऱ्या विविध प्रकारच्या लहान वृक्षांकडे दुर्लक्ष करून त्यांना तोडले जाते. मात्र या वृक्षांच्या संवर्धनाच्या हेतूने ‘मिशन ग्रीन मुंबई’तर्फे त्यांना दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यापूर्वी कुलाबा-सिप्झ-वांद्रे या ‘मेट्रो-३’ आणि दहिसर-डी. एन. नगर या ‘मेट्रो-२ ए’ मार्गिके चे बांधकाम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणाहूनही मोठय़ा संख्येने झाडांना दत्तक घेण्यात आले होते. ‘मेट्रो-२ ए’ मार्गिके मधील न्यू लिंक मार्गावरील सुमारे दोन हजार आणि ‘मेट्रो-३’ मार्गिकेमधील विविध ठिकाणांहून पाच हजार वृक्षांना दत्तक घेण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा विशेषत: गृहनिर्माण संकुलाचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. याच पद्धतीने ‘मेट्रो-२ बी’ प्रकल्पाच्या बांधकामांतर्गत येणाऱ्या वृक्षांना दत्तक घेतले जाणार आहे. जुहूच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सध्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. येथील रस्त्यांच्या दुभाजकांवर असलेल्या फिर्कस, क्रोटोस, टागोर, कुडलिंब अशा झाडांना आणि जांभूळ, आंबा, लिंबू यांसारख्या फळझाडांना दत्तक घेण्याचे आवाहन ‘मिशन ग्रीन मुंबई’ या संस्थेने समाजमाध्यमांद्वारे केले आहे.

मेट्रोच्या बांधकामांतर्गत येणाऱ्या मोठय़ा वृक्षांना दत्तक घेणे शक्य नसल्याने छोटय़ा वृक्षांना जीवदान देण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माजामतून केला जात असल्याची माहिती ‘मिशन ग्रीन मुंबई’चे सुभाजित मुखर्जी यांनी दिली. रस्त्याच्या दुभाजकांवर मोठय़ा संख्येने छोटय़ा आकाराची झाडे असल्याने गृहनिर्माण सोसायटय़ांना ही झाडे दत्तक घेण्यासाठी आमंत्रित केल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या मध्यभागी बॅरिकेट लावण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुभाजकावरील वृक्षांना दत्तक देण्याच्या मोहिमेला मदत करणार असल्याची माहिती मेट्रो-२ बी प्रकल्पातील अभियांत्रिकाने दिली.

‘केना’साठी प्लास्टिकचे तरंगते बेट

दहिसर नदीत जलशुद्धीकरणासाठी प्रायोगिक  तत्त्वावर ‘रिव्हर मार्च’ मोहिमेअंतर्गत केना या वनस्पतीचे तरंगते बेट तयार करण्यात आले होते. ‘केना’ ही वनस्पती पाण्यातील दूषित घटके शोषून घेत असल्याने तिचा वापर करण्यात आला होता. या कामासाठी मेट्रो-२ ए या प्रकल्पाअंतर्गत अंधेरीतील न्यू लिंक रस्त्यांवरील दुभाजकावर असलेली केना वनस्पती दत्तक मोहिमेअंतर्गत त्या ठिकाणाहून घेण्यात आली होती. प्लॉस्टिकच्या बाटल्यांचे तरंगते बेट तयार करून त्यामध्ये सुमारे दोन हजार केना वनस्पती लावून ते दहिसर नदीत सोडण्यात आले होते.