प्रसाद रावकर prasadraokar@gmail.com

अयोग्य पद्धतीने फांद्यांची छाटणी केल्यामुळे झाडांचा समतोल ढळून ते उन्मळून पडत आहेत. रस्त्यांची कामे करताना अगदी बुंध्याशी केलेले सिमेंट काँक्रीटीकरणही झाडांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करू लागले आहेत. रस्त्यांच्या कामांमुळे दुखावलेली मुळे आणि छाटणीमुळे ढळलेला समतोल ही दोन कारणे वृक्ष उन्मळून पडण्यास पुरेशी आहेत.

मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टीने हाहाकार उडाला आणि चिंतनानंतर प्लास्टिकच्या पिशव्या आणि अरुंद नाल्यांमुळे निर्माण झालेला धोका यंत्रणांच्या लक्षात आला. त्यानंतर नाल्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण पालिकेने हाती घेतले. त्याचबरोबर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर पालिकेने बंदी घातली. गेल्या वर्षी तर राज्य सरकारनेही प्लास्टिक बंदी जारी केली. पण ‘२६ जुलै’च्या घटनेला इतकी वर्षे लोटली तरी पालिकेला मुंबईतील नदी-नाले सुरक्षित करता आलेले नाहीत. त्याचबरोबर स्वत: लागू केलेली आणि राज्य सरकारने जारी केलेल्या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीत पालिकेला सपशेल यश आले आहे. त्यामुळे नाले आणि प्लास्टिक हे दोन्ही धोके आजही कायमच आहेत. काळाच्या ओघात मुंबईमधील पादचारी, उड्डाणपूल, आकाशमार्गिका धोकादायक बनू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पूल कोसळला आणि मुंबईतील पुलांच्या रूपात नवा धोका मुंबईकरांपुढे उभा ठाकला. पूल प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोठय़ा दिमाखात हिरवाई जपणारे वृक्ष सोसाटय़ाच्या वाऱ्याचा मार सहन न झाल्यामुळे उन्मळून पडू लागले. अवघ्या दोन दिवसांमध्ये उन्मळून पडलेल्या वृक्षांनी तिघांचा बळी घेतला आणि उन्हाच्या तडाख्यात क्षणभर का होईना सावलीचे छत्र निर्माण करणारे रस्त्याच्या कडेचे आणि खासगी भूखंडावरील वृक्ष धोकादायक बनू लागले. मुंबईकरांसाठी धोकादायक ठरणाऱ्या गोष्टींची यादी हळूहळू मोठी होऊ लागली आहे. ही मुंबईकरांच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणावी लागेल.

गेल्या दोन दशकांमध्ये मुंबईमधील पदपथ, रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर कामे करण्यात आली. ही कामे करताना रस्त्यालगतच्या झाडांची काळजी घेणे गरजेचे होते. ती न घेतल्यामुळे झाडांची मुळे दुखावली आणि अल्पावधीत काही झाडे उन्मळून पडली. काही दुकानदार आणि विकासकांना नकोशा झालेल्या झाडांचा बळी घेतला गेला. एकीकडे सरकार दरवर्षी कोटय़वधी वृक्षांच्या लागवडीचा संकल्प सोडत असते तर दुसऱ्या बाजूला वृक्षांची स्वार्थासाठी कत्तल केली जाते किंवा पावसाळ्यात पडझड होत असते.

अरबी समुद्रामध्ये ‘वायू’ चक्रीवादळाने ताल धरला आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यांनी मुंबई गाठली. सोसाटय़ाचा वारा आणि अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे मुंबईत सुखद गारवा निर्माण झाला आणि मुंबईकर काही वेळ का होईना पण सुखावला. पण या सुखद गारव्यामध्ये एक नवं संकट मुंबईकरांसमोर ठाकले. वाऱ्याचा वेग ताशी २० ते २८ कि.मी. वेगाने वाहू लागला आणि वृक्ष उन्मळून पडण्याच्या आणि मोठय़ा वृक्षांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. तीन ठिकाणी उन्मळून पडलेल्या वृक्षांखाली तीन मुंबईकरांचा बळी गेला. दोन घटना खासगी भूखंडावरील वृक्ष कोसळल्यामुळे घडल्या. त्यामुळे खासगी भूखंडावरील वृक्षवल्लींचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये वृक्ष पडझडीच्या घटना टाळण्यासाठी पालिकेने पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणीची कामे हाती घेतली आहेत. मात्र तरीही हा धोका टळलेला नाही. झाडांची अशास्त्रीय पद्धतीने केली जाणारी छाटणीही त्यांच्या मुळावर उठली आहेत. अयोग्य पद्धतीने फांद्याची छाटणी केल्यामुळे झाडांचा समतोल ढळून ते उन्मळून पडत आहेत. रस्त्यांची कामे करताना अगदी बुंध्याशी केलेले सिमेंट काँक्रीटीकरणही झाडांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करू लागले आहेत. रस्त्यांच्या कामांमुळे दुखावलेली मुळे आणि छाटणीमुळे ढळलेला समतोल ही दोन कारणे वृक्ष उन्मळून पडण्यास पुरेशी आहेत. अशा परिस्थितीत वृक्ष सोसाटय़ाच्या वाऱ्याचा मार सहन करून शकत नाहीत. त्यामुळे प्राणवायू देणाऱ्या वृक्षांचाच प्राण हरपू लागला आहे. दिवसेंदिवस पर्यावरणीय प्रश्न जटिल बनू लागले आहेत. जागतिक तापमानाचे परिणाम हळूहळू आपल्यालाही जाणवायला लागले आहेत. अशा वेळी वृक्षवल्लींची विशेष काळजी घेणे हे केवळ पालिकेचेच नव्हे तर प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. याची जाणिव नागरिकांना केव्हा होणार हाच प्रश्न आहे.