|| प्रसाद रावकर

मध्य वैतरणा धरणक्षेत्रात लागवड, संवर्धनासाठी राज्य सरकारी उपक्रमावर मदार

राज्य सरकारच्या वृक्ष लागवड योजनेत खारूताईचा वाटा उचलण्यासाठी पालिकेने मध्य वैतरणा धरणक्षेत्रात १५ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प सोडला आहे. मात्र आपला हा संकल्प तडीस नेण्यासाठी पालिकेची मदार मुख्यत्वे राज्य सरकारच्या ‘फॉरेस्ट डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र’ या उपक्रमावर असून वृक्ष लागवड आणि संगोपनाची जबाबदारी पालिकेने या उपक्रमावर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी पालिकेच्या तिजोरीतून उपक्रमास तब्बल २.१४ कोटी रुपयांहून अधिक निधी देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून हरित क्षेत्रे वाढविण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. या योजनेला पालिकेनेही हातभार लावत वृक्षारोपण सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने मध्य वैतरणा धरणक्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य वैतरणा धरणक्षेत्रातील सुमारे १३.५ हेक्टर जागेवर १५ हजार वृक्ष लागवड करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. धरणक्षेत्रातील परिसराची पाहणी करून वृक्ष लागवडीसाठी जागा निवडण्यात आली आहे. पालिका दरबारी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा असताना, तसेच स्वतंत्र उद्यान विभाग कार्यरत असताना १५ हजार वृक्ष लागवडीचे काम ‘फॉरेस्ट डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र’ या उपक्रमास सोपविण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. धरणक्षेत्रातील नियोजित स्थळी तीन महिन्यांमध्ये १५ हजार वृक्षांची लागवड करणे आणि त्यापुढील सात वर्षांमध्ये या वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन करण्याचे काम या उपक्रमाला करावे लागणार आहे. या कामासाठी पालिकेकडून उपक्रमाला सात वर्षांसाठी तब्बल दोन कोटी १४ लाख ९५ हजार २६९ रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सुरुवातीला पूर्वपावसाळी कामांसाठी १० लाख २० हजार ३२१ रुपये देण्यात येणार आहेत. पहिल्या वर्षांसाठी एक कोटी १९ लाख ५० हजार ८७२ रुपये उपक्रमाला देण्यात येणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सहा वर्षांमध्ये उर्वरित रक्कमही दिली जाणार आहे. उपक्रमामार्फत मध्य वैतरणा धरणक्षेत्रातील नियोजित स्थळी ताह्मण, बहावा, पुत्रंजीवा, अशोक, बकुळ, कांचन, अर्जुन, बेहडा, आवळा, खैर इत्यादी देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.