पालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाचा हरित संकल्प

विकासकामांच्या निमित्ताने मुंबईत बेसुमार वृक्षतोड होत असून त्या प्रमाणात वृक्षलागवड होताना दिसत नाही. याचा पर्यावरणावर होऊ लागलेला विपरीत परिणाम लक्षात घेऊन पालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाने एक अनोखा संकल्प सोडला आहे. पालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाला पार्टी समारंभ आयोजित करण्याऐवजी त्याच्या हस्ते एक झाड लावण्याचा निर्धार या कार्यालयाने केला आहे.

पालिका कार्यालयात दररोज किमान एका अधिकाऱ्याचा अथवा कर्मचाऱ्याचा वाढदिवस असतो. अशा वेळी संबंधित विभागातील कर्मचारी आपापल्या परीने अधिकारी, कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करीत असतात. छोटेखानी पार्टी आयोजित केली जाते आणि वाढदिवसानिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्याला भेटवस्तू दिली जाते. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याचा ‘तो’ दिवस गोड केला जातो; पण आता अधिकारी अथवा कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या हस्ते एक वृक्ष लावण्याचा संकल्प ‘बी’ विभाग कार्यालयाने संकल्प सोडला आहे.

‘बी’ विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरातील सीताराम शेणॉय उद्यानामध्ये कैलासपती आणि लक्ष्मीतरू या वृक्षांच्या रोपांची लागवड केली आहे. ‘बी’ विभाग कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच हस्ते या रोपांचे रोपण करण्यात येणार आहे. पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त अलीकडेच उमरखाडी परिसरातील वीर संभाजी उद्यानात पाच रोपांची लागवड करण्यात आली.

कैलासपती, लक्ष्मीतरूची लागवड

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वाढदिवशी कोणत्या वृक्षाची लागवड करायची यावर बऱ्याच विचारांती पालिका कार्यालयाने कैलासपती व लक्ष्मीतरू या झाडांची निवड केली आहे. ब्रिटिशांच्या काळात अशा वृक्षांची लागवड केली जात होती. साधारण ९० फुटांपर्यंत उंच वाढणारे कैलासपती हे झाड डेरेदार बनून शीतल छायाही देते. तसेच या वृक्षावर बहरणारी पांढरीशुभ्र आणि गुलाबी छटा असलेली फुले मन मोहून घेतात. त्याचप्रमाणे लक्ष्मीतरू हे झाड विविध आजारांसाठी गुणकारी मानले जाते. या वृक्षाच्या बियांपासून गुणकारी तेलही काढले जाते. त्यामुळे या दोन झाडांची पालिका कार्यालयाने निवड केली आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पादचाऱ्यांना कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतात. अशी ठिकाणे हेरून त्या ठिकाणी कैलासपती आणि लक्ष्मीतरूचे रोपण करण्याचा मानस आहे. हे वृक्ष बहरल्यानंतर पादचाऱ्यांना सावली मिळू शकेल. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण केल्यास पालिकेतर्फे साजरा झालेला त्यांचा जन्मदिवस कायम त्यांच्या समरणात राहील आणि ‘हरित मुंबई, सुंदर मुंबई’चे स्वप्न साकारण्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा हा संकल्प खारुताईचा वाटा ठरेल.

उदयकुमार शिरुरकर, साहाय्यक आयुक्त, ‘बीविभाग कार्यालय