मुंब्रा येथील संजयनगर भागातील गेल्या तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या नूर इमारतीमधील काही खांबांना रविवारी तडे गेल्याची बाब लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. इमारतीच्या अंतर्गत डागडुजीचे काम सुरू असताना हा प्रकार घडला.
मुंब््रय़ात गेल्याच आठवडय़ात इमारत दुर्घटना घडली. याशिवाय  इमारती खचण्याचे प्रकार सुरूच असून नूर इमारतीच्या काही खांबांना तडे गेल्याची माहिती पालिका प्रशासन, पोलिसांना कळताच तातडीने मदतकार्यासाठी धावपळ करण्यात आली.
संजयनगरमधील नूर इमारत ही सहा माळ्यांची आहे. या इमारतीत २१ कुटुंबे राहतात. ७ व्यापारी गाळे आहेत. तिसऱ्या व चौथ्या माळ्यावरील कुटुंबातील काही सदस्यांना आपल्या घरातील, बाहेरील खांबांना, इमारतीला तडे गेल्याची बाब सकाळी निदर्शनास आली. तातडीने सर्व कुटुंबीयांनी घरातून बाहेर पळ काढला. इमारतीमधील सर्व रहिवाशांना घरे खाली करण्यास सांगितले.
अचानक घर सोडून जायचे कोठे, असा प्रश्न निर्माण झाल्याने रहिवाशांनी घरे सोडण्यास नकार दिला. मात्र पालिका अधिकारी, पोलिसांनी बळाचा वापर करून रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या. दरम्यान, तात्पुरत्या संक्रमण शिबिराऐवजी आम्हाला झोपु योजनेच्या पक्क्य़ा घरात स्थलांतरित करा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.