अनेक ताडाची झाडे विद्रूप, तरुणांकडून झाडांवर नावे, आकृत्या, चित्रे यांचे कोरीवकाम
भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणी बाग) वन्य जीवांशी माकडचाळे करणारे अनेक पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात. येथील प्राण्यांना दगड मारणे, त्यांना चिडवणे असे उद्योग येथे पर्यटकांकडून वारंवार होताना दिसते. मात्र या उच्छादी पर्यटकांचा त्रास आता वन्यजीवांबरोबरच येथील वृक्षांनाही होत असल्याचे दिसून येत आहे.
राणीच्या बागेत मोठय़ा प्रमाणात जैवविविधता आढळून येते. या उद्यानात किमान १५०० ते २००० वृक्ष आहेत. येथे गोरखचिंच, कैलासपती, उंदीरमार, झुंबर, जंगली बादाम, ताड, सीतेचा अशोक असे विविध प्रकारचे वृक्ष येथे आहेत. मात्र या वृक्षसंपदेची जाण नसलेल्या काही पर्यटकांनी येथील १५-२० ताडाच्या खोडांवर धारदार शस्त्रांनी आपली नावे, काही आकृत्या, चित्रे कोरून ठेवली आहेत. मात्र याकडे उद्यानातील कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.
ही ताडांची झाडे २० ते २२ वर्षांपूर्वी उद्यानात लावण्यात आली होती. ताडाच्या वृक्षाला औषधी समजले जाते. या वृक्षाच्या खोडापासून अनेक गुणकारी औषधे बनवली जातात. मात्र या वृक्षांसंबंधीची पुरेशी माहिती काही पर्यटकांना नसल्याने अशा प्रकारचे चाळे पर्यटकांकडून केले जात आहेत, असे उद्यानातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

‘पर्यटकांना माहिती द्या’
वृक्षांसंबंधीचा इतिहास, त्याची थोडक्यात माहिती फलकांवर लिहून ठेवल्यास पर्यटकांनादेखील त्या वृक्षांची माहिती प्राप्त होईल. प्राणी नाही तर निदान वेगवेगळे वृक्ष, त्यांचे गुणधर्म याची माहिती करून घेण्यास मदत होईल. पर्यटकांना ही माहिती मिळत नसल्याने कदाचित त्यांच्याकडून अशा प्रकारची कृत्ये होत असावीत, असे एका पर्यटकाने सांगितले.

राणीच्या बागेतील काही वृक्ष हे अत्यंत दुर्मीळ आहेत, मात्र वृक्षांमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असल्याने खोडांवर कोरलेली नावे काही कालांतराने भरली जाऊ शकतील. मात्र या अशा पर्यटकांमुळे वृक्ष विद्रूप होत आहेत. त्यांना आवर घालणे गरजेचे आहे.
– डॉ. रंजन देसाई, वनस्पतितज्ज्ञ