News Flash

तिरंगी लढतीचे भाजपपुढे आव्हान

शिवसेनेने दिलेला स्वबळाचा नारा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची निर्माण झालेली शक्यता या पाश्र्वभूमीवर आगामी निवडणुकीत तिरंगी लढतीचे भाजपपुढे मोठे आव्हान असेल.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी झालेली चौरंगी लढत याचा भाजपला फायदा झाला होता. शिवसेनेने दिलेला स्वबळाचा नारा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची निर्माण झालेली शक्यता या पाश्र्वभूमीवर आगामी निवडणुकीत तिरंगी लढतीचे भाजपपुढे मोठे आव्हान असेल. यामुळेच राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्या अधिक जवळ जाणार नाही अशी खेळी भाजपकडून केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा मोदी लाटेचा राज्यात प्रभाव होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या विरोधात तेव्हा तीव्र विरोधी वातावरण होते. शिवसेनेने स्वबळावर लढताना ६३ जागा जिंकल्या होत्या. गेल्या वर्षभरात झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांवरून राज्यात भाजपची हवा असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत झाल्यास चित्र कसे असेल, याची राजकीय वर्तुळात साहजिकच उत्सुकता आहे.

भाजपच्या विरोधात वातावरण तयार होऊ लागले आहे. अलीकडेच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली. दोनच दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपला कडवे आव्हान दिले. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात सत्ताधारी भाजपच्या विरोधात नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या या नाराजीचा फटका गुजरात निवडणुकीत सौराष्ट्र विभागात बसला होता. मध्य प्रदेशातही शेतकरी वर्गात नाराजीची भावना आहे. महाराष्ट्रातही चित्र फारसे वेगळे नाही. कर्जमाफी योजनेचा शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळालेला नसल्याने अजून तरी राजकीय फायदा उठविण्यात भाजप यशस्वी झालेला नाही. ग्रामीण भागात भाजपच्या विरोधात वातावरण असल्याचा दावा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जातो.  या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भाजपकडून विविध क्लृप्त्या केल्या जाऊ शकतात.

  • भाजपच्या विरोधात वातावरण तयार होऊ लागले आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भाजपकडून विविध क्लृप्त्या केल्या जाऊ शकतात.
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, असे पद्धतशीरपणे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
  • राष्ट्रवादीचा वापर करून काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढल्यास ते आमच्या पथ्यावर पडेल, असे भाजपचे नेते सांगतात.
  • निवडणुकांना अद्याप वर्षभराचा कालावधी असल्याने कशी समीकरणे तयार होतात यावरही सारे अवलंबून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 3:59 am

Web Title: triangular fight in maharashtra bjp shiv sena congress ncp upcoming election 2019
Next Stories
1 शिवसेना खासदारांमध्ये चलबिचल
2 ज्येष्ठ साम्यवादी नेते यशवंत चव्हाण यांचे निधन
3 न्यायाधीशांची बदली का झाली?
Just Now!
X