काँग्रेसच्या उमेदवारीवर समीकरणे अवलंबून

मुंबई : मुंबई महापालिकेतील स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस आणि भाजपने आपापले उमेदवार उतरवले आहेत.  पदरी संख्याबळ अधिक असले तरी आयत्या वेळी भाजपने काही वेगळी खेळी केली तर अध्यक्षपद गमवावे लागेल अशी चिंता सत्ताधारी शिवसेनेला आहे. तर दुसरीकडे उमेदवारी मागे घ्यायची की निवडणूक लढवायची असा पेच काँग्रेससमोर आहे. या संदर्भात सोमवारी सकाळीच निर्णय घेण्यात येईल असे काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याने सांगितले.

दरवर्षी मार्च-एप्रिल दरम्यान मुंबई महापालिकेत वैधानिक, विशेष आणि प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपताच्या निवडणुकांचे वारे वाहू लागतात. अध्यक्षपद पदरात पडावे यासाठी नगरसेवक व्यूहरचना करण्यात गुंतलेले असतात. यंदा मार्चमध्ये करोनाचा संसर्ग सुरू झाला आणि त्यानंतर टाळेबंदी, संचारबंदी लागू झाली. त्यामुळे यंदा या निवडणुका वेळेत होऊ शकल्या नाहीत.

सत्ताधारी शिवसेनेने स्थायी समिती अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव यांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे.  यंदा भाजपने या निवडणुकीत उमेदवार दिला आहे. त्यांनी मकरंद नार्वेकर यांना, तर काँग्रेसने असिफ झकेरिया यांना रिंगणात उतरविले आहे.

स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे ११, भााजपचे १०, काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एक असे बलाबल आहे. त्याशिवाय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवडून येणाऱ्या व्यक्तीची स्थायी समितीच्या पदसिद्ध सदस्यपदी नियुक्ती होते. शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला तर त्यांचे स्थायी समितीमधील संख्याबळ १२ होईल. हे बलाबल लक्षात घेता शिवसेनेला स्थायी समितीच्या निवडणुकीत विजय मिळू शकतो. काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यास शिवसेनेचा सहज विजय होऊ शकेल. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक पार पडली. परंतु उमेदवारी मागे घेण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले. तर या बाबत सोमवारी सकळी निर्णय घेण्यात येईल, असे काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने संध्या दोशी, भाजपने पालिकेतील नगरसेविका सुरेखा पाटील यांना, तर काँग्रेसने संगीता हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. शिक्षण समितीत शिवसेनेचे ११, भाजपचे १०, काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामुळे शिक्षण समिती अध्यक्षपदातही शिवसेनेचे पारडे जड आहे.