आरेमधील काही पाडय़ांतील आदिवासींनी शुक्रवारी प्राणिसंग्रहालयाच्या भिंतीच्या कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या वृक्षतोडीस कडाडून विरोध केला आणि काम थांबवण्यास भाग पाडले. आरेमधील युनिट नंबर २५ जवळील या भागात आदिवासींची शेतजमीन असल्याचा दावा आहे.

सोमवारी आदिवासींच्या दाव्याबाबत वनाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील ट्वीट केले. दुपारी वृक्षतोड सुरू झाल्यानंतर ‘सेव्ह आरे’ मोहिमेतील अनेकांनी याबाबत ट्वीट करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरा वृक्षतोडीसाठी आलेले जेसीबी येथून निघून गेले.

आरेमधील खांबाचा पाडाजवळील युनिट २५ येथे प्राणिसंग्रहालयासाठी भिंत उभारण्याचे काम मार्चमध्ये सुरू करण्यात आले. या कंत्राटदाराने गुरुवारपासून पुन्हा काम सुरू केल्याची माहिती खांबाच्या पाडय़ातील आदिवासींनी दिली.