गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघातर्फे  शनिवारी  ‘स्मृतिसंध्या’ या विशेष आदरांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समीक्षक डॉ. द.भि. कुलकर्णी, संपादक डॉ. अरुण टिकेकर, कविवर्य मंगेश पाडगावकर व शंकर वैद्य यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

यावेळी डॉ. द. भि. कुलकर्णी व डॉ. अरुण टिकेकर यांच्या आठवणी जागविणाऱ्या व्याख्यानांचे तर पाडगावकर व वैद्य यांच्या गाण्यांचेही सादरीकरण करण्यात आले.

यावेळी श्याम जोशी यांनी आपल्या व्याख्यानात द.भिं.च्या आठवणी जागवत असतानाच त्यांच्या समीक्षेचे मराठी साहित्यातील महत्त्वही अधोरेखित केले, तर दिनकर गांगल यांनी डॉ. टिकेकरांवर दिलेल्या व्याख्यानात टिकेकरांबरोबर असलेला अनेक वर्षांचा स्नेहबंध उलगडला.

टिकेकरांना साहित्य-संस्कृती क्षेत्रांमधील संस्थांचे साचलेपण, शैक्षणिक क्षेत्रातील ढोंगबाजी आदी बाबींमुळे त्रास होत असे; तर विद्वत्ता, कलाक्षेत्रातील चमक त्यांना आकृष्ट करत असे, यावेळी दिनकर गांगल यावेळी म्हणाले.

यानंतर शंकर वैद्य व मंगेश पाडगावकर यांच्या गेय कवितांचे व गाण्यांचे सादरीकरण गायक अभिजित राणे व गायिका मृदुला साठे यांनी केले. कार्यक्रमात साहित्य संघातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘साहित्य’ या नियतकालिकाचेही प्रकाशन गांगल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी साहित्य क्षेत्रांतील अनेक मान्यवर, रसिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.