महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर
दादर स्थानकात उतरल्यापासून जथ्थ्याजथ्थ्याने एका ओढीने चैत्यभूमीकडे जाणारा भीमसैनिकांचा अफाट महासागर.. त्यातून मध्येच एखाद्या भीमसैनिकाने दिलेल्या घोषणेला ‘जय भीम’च्या गजराने दिलेली साथ.. ठिकठिकाणी ऐकू येणारी भीमगीते.. यांमुळे दादरमध्ये ‘निळाई’ उदंड जाहली होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अलोट भीमसागर लोटला होता.
देशाच्या कानाकोपऱ्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिला अभिवादन करण्यासाठी लोक चैत्यभूमीवर आले होते. महामानवाला प्रणाम करण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या लोकांनी शनिवारी संध्याकाळपासूनच चैत्यभूमीवर डेरा टाकला होता. रविवारी या गर्दीत आणखीनच भर पडत गेली. संध्याकाळपर्यंत चैत्यभूमीवर भीमसैनिकांचा लोंढा येतच होता. या जनसागरामुळे दादरमधील रस्ते आणि गल्ल्या गर्दीने फुलल्या होत्या.
शिवाजी पार्कवरही दरवर्षीप्रमाणे उत्साहाचे वातावरण होते. डॉ. आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची छायाचित्रे तसेच पुतळे विकणारे, मोत्याच्या माळेत नीलमणी आणि धम्मचक्र विकणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा तसेच इतर चळवळीविषयक पुस्तके, मोफत अन्नदान करणारे अशा अनेक स्टॉल्सचा गराडा शिवाजी पार्कला पडला होता. खुद्द मैदानातही वैद्यकीय सेवा, मोफत नेत्रतपासणी, महापालिकेतर्फे टाकलेला मांडव, फिरती स्वच्छतागृहे यांची दाटी झाली होती. विशेष म्हणजे विविध कलाकारांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या भीमगीतांच्या सीडी विकण्यासाठी थोडेथोडके नाही, तर १६हून अधिक स्टॉल उभारण्यात आले होते.

भीमसैनिकांना इंदू मिलचा सक्तीचा फेरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक इंदू मिल येथे बनवण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भीमसैनिकांना रविवारी इंदू मिलचा सक्तीचा फेरा पडत होता. चैत्यभूमी येथे जाण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरापासून लागणारी रांग यंदा पोलिसांनी इंदू मिलमध्ये वळवली होती. येथे भूमिपूजन केलेल्या चौथऱ्याचे ‘दर्शन’ घेतल्यानंतर ही रांग पुन्हा मुख्य मार्गाकडे वळवली जात होती.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ५९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी दादर येथे चैत्यभूमीवर भीमसागर लोटला होता.