* गगनभेदी घोषणांनी चैत्यभूमीचा परिसर दणाणला  
* डॉ. आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलसमोर भीमसैनिकांचा ठिय्या
खांद्यावर निळे ध्वज, डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकाराच्या गगनभेदी घोषणा, महिला आणि वृद्धांची अलोट गर्दी हे दर वर्षी ५ आणि ६ डिसेंबरला दादर परिसरात दिसणारे दृश्य यंदाही तसेच साग्रसंगीत होते. मात्र यंदा राज्य आणि केंद्र सरकारविषयीच्या संतापाची अधिकची मात्रा जाणवण्याइतपत होती. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी जाहीर झालेली इंदू मिलची जागा अद्याप ताब्यात न मिळाल्याने घोषणांद्वारे आपला संताप व्यक्त करीतच भीमसैनिक चैत्यभूमीवर दाखल होत होते. ‘टिळा भडक, जय भीम कडक’ यासारख्या घोषणेतून भीमसैनिकांच्या भावना व्यक्त होत होत्या.
शुक्रवारी पहाटेपासूनच भीमसैनिकांची वर्दळ वाढू लागली आणि अवघे दादर निळे होऊन गेले. ‘टिळा भडक, भीमसैनिक कडक’, ‘कोण सांगतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘बाबासाहेब अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा घोषणा देत इंदू मिलच्या समोर रिपाइंचे कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले. थोडय़ा वेळाने ते चैत्यभूमीच्या दिशेने गेल्यावर त्यांची जागा दुसऱ्या गटाने घेतली. इंदू मिलच्या समोर असा घोषणाबाजीचा परिपाठ दिवसभर सुरूच होता.
दिवस चढू लागला तसतशी चैत्यभूमीवरील रांग वाढू लागली. उन्हाचे चटके सहन करीत लाखो भीमसैनिक शांतपणे रांगेत उभे होते. त्यांच्यासाठी पाणी, चहा-नाश्ता, प्रसाधनगृह आदींची चोख व्यवस्था होती. भिख्खूंची लगबगही लक्ष वेधून घेत होती. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून चैत्यभूमीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर पथाऱ्या पसरून अनेकांनी पुस्तके, पुतळे, चित्रे, बिल्ले, गाण्याच्या सीडी आदी वस्तूंची विक्री सुरू केली होती. या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. अभिवादन करून परतणारे अनुयायी आपसूकच या स्टॉलपाशी थांबत होते. आंबेडकरांचे चरित्र, त्यांचे गौतम बुद्धाचे प्लास्टर ऑफ पॅरिसचे पुतळे यांचीही विक्री जोमाने सुरू होती.
चैत्यभूमी आणि इंदू मिलच्या दरम्यान रस्त्यावरच छोटय़ा टेम्पोमधून भोजनाचे वाटप करण्यात येत होते. काही टेम्पोंपुढे गर्दी झाल्याने खाद्यपदार्थाचे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र खाऊन झाल्यावर रिकाम्या प्लेट कुठे टाकाव्या हे न कळल्यामुळे मंडळी तिथेच त्या फेकून देत होती.
बॅनर्सची गर्दी
न्यायालयाने बॅनर्स काढण्याचे आदेश देताच महापालिकेने अवघ्या मुंबापुरीमधील बॅनर्स उतरविले होते. परंतु महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून चैत्यभूमीच्या परिसरात दिल्लीपासून गल्लीपर्यंत अनेक नेत्यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करणारे मोठमोठे बॅनर्स झळकविले होते. थेट दादर रेल्वे स्थानकापर्यंत मिळेल त्या जागी बॅनर्स झळकविण्याची संधी या नेत्यांनी
सोडली नव्हती.