मुंबईतील पहिल्यावहिल्या घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी शुक्रवारपासून मासिक पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेने नियमितपणे प्रवास करणाऱ्यांना तब्बल ३३ टक्के कमी शुल्क मोजावे लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील रेल्वेसेवेच्या धर्तीवर मेट्रोसाठीही मासिक पासची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. सार्वजनिक-खासगी सहभागातून उभारण्यात आलेल्या मेट्रोचा कारभार सध्या एमएमओपीएल(मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड) सांभाळत आहे. सध्या मेट्रोच्या एकेरी प्रवासासाठी १० ते २० रूपयांदरम्यान पैसे मोजावे लागतात. मात्र, मासिक पासच्या सुविधेमुळे प्रवाशांना फक्त १३.३३ रूपये मोजावे लागणार आहेत. ‘एमएमओपीएल’द्वारे प्रवाशांसाठी मासिक पासच्या दोन प्रकारच्या सेवा पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये ६०० रूपये मोजून तुम्हाला मेट्रोतून ४५ वेळा प्रवास करता येणार आहे. तर दुसऱ्या प्रकारच्या मासिक पास सुविधेत ८०० रूपये मोजून प्रवाशांना ६० वेळा प्रवास करता येणार आहे. या दोन्ही प्रकारच्या मासिक पासची वैधता ३० दिवस इतकी असणार आहे.  सध्या मेट्रोच्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या ११.४ किलोमीटरच्या मार्गावरील तिकीट प्रवासाचे दर १०-१५-२० इतके निश्चित करण्यात आले आहेत.