तिहेरी हत्याकांडाच्या दोन घटनांनी शिर्डी आणि नवी मुंबई ही दोन शहरं हादरली आहेत. दोन्ही ठिकाणी तिहेरी हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. शिर्डीमध्ये झालेल्या हत्याकांडातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.  तर नवी मुंबईतील तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे असे पोलिसांनी म्हटले आहे.

शिर्डीतील राहता निमगाव या ठिकाणी ठाकूर कुटुंबीयांमधील तिघांना अर्जुन पन्हाळे याने कोयत्याचे वार करून संपवले आहे. तर या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर उपचार सुरू आहेत. या घटनेत सहा वर्षांची मुलगी बचावली आहे. दुसरीकडे नवी मुंबईतली वाशी स्टेशनजवळ विजय मलिक उर्फ दारासिंग या भंगार व्यावसायिकाशी निगडीत व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर शनिवारी तुर्भे येथील गोडाऊन मध्ये भंगार व्यवसायाशी संबंधित तिघांचे मृतदेह आढळले आहेत. या तिघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. नावेद, नौशाद आणि राजेश अशी हत्या झालेल्या तिघांची नावं आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

शिर्डी येथील निमगाव वस्तीवर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास अर्जुन पन्हाळे यांनी कोयत्याने वार करुन ठाकूर कुटुंबीयातील तिघांचे गळे चिरले. शाळेत जाण्याची तयारी करत असलेल्या १६ वर्षांच्या मुलीचीही त्याने कोयत्याने वार करुन हत्या केली. राजेंद्र ठाकूर आणि तावू ठाकूर हे दोघे अर्जुनच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हत्या केल्यानंतर आरोपी घराच्या शेजारी असलेल्या खोलीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे शिर्डी हादरली आहे.

दुसरीकडे तुर्भे येथील एमआयडीसीतील बोनसरी गावात भंगारच्या गोदामातील तीन कामगारांची हत्या करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. गोदामातील चोरीच्या उद्देशाने या हत्या झाल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त होतो आहे. डोक्यात जड वस्तूचे वार करुन आणि धारदार शस्त्राने वार करुन या तिघांना संपवण्यात आलं आहे. शनिवारी सकाळीच हा प्रकारही उघड झाला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.