‘एमआयएम’चे आणखी सात कार्यकर्ते अटकेत

फेसबुकवरून आक्षेपार्ह छायाचित्र आणि मजकूर प्रसारित झाल्यानंतर ट्रॉम्बे परिसरात उसळलेला जनक्षोभ पूर्वनियोजित कटाचा भाग होता, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा मजकूर उजेडात आल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्याला कोणाची फूस होती, याचा शोध सुरू असून त्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या ‘एमआयएम’ पक्षाचे नगरसेवक शहानवाज हुसेन आणि अन्य आरोपींची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी ‘एमआयएम’च्या आणखी सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित करणाऱ्या तरुणाने छायाचित्र ‘शेअर’ केल्यानंतर काही वेळातच नगरसेवक शहानवाज हुसेन यांना फोन केला होता. आपल्या हातून एक चूक घडली असून एक आक्षेपार्ह छायाचित्र चुकून ‘शेअर’ झाले, असे या तरुणाने हुसेन यांना सांगितल्याचे समजते. ‘कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता,’ असे या तरुणाने सांगताच शहानवाज यांनी त्याला ‘तू घाबरू नकोस. घरीच थांब,’ असा सल्ला दिला होता; परंतु या फोननंतर अवघ्या दहा मिनिटांत ५० जणांचा जमाव त्या तरुणाच्या घराबाहेर जमला व त्याला बाहेर आणण्यासाठी आक्रमक बनला. या घटनेचे वृत्त समजताच ट्रॉम्बे पोलिसांनी तातडीने तरुणाच्या घरी धाव घेऊन त्याला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांकडे आलेली फिर्याद शहानवाज यांच्या चालकाने केली होती.

हे प्रकरण इथेच संपेल असे वाटत असतानाच, तरुणाच्या घरासमोर जमलेल्या जमावाने पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. शहानवाज यांनीच चिथावणी दिल्याने हा जमाव आक्रमक बनला, अशी माहिती पोलिसांना मिळाली असून त्याची शहानिशा करण्यात येत आहे. तपासाशी संबंधित

अन्य वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यावर हल्ला घडला त्या दिवशी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत शहानवाज बाहेर जमावासोबत होते. जमावाला चिथवून ते तेथून निघून गेले, ही बाबही अन्य आरोपींच्या चौकशीतून समोर येते आहे. या घटनेने परिसरातला तणाव शांत करण्याऐवजी शहानवाज यांनी त्यात तेल ओतले, हे प्रकरण गरम करून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता का, या दृष्टीनेही तपास सुरू आहे.  दरम्यान, या हल्ल्याची तुलना आझाद मैदान दंगल, भिवंडी पोलीस हत्याकांडाशी करत हिंदु जनजागृती समितीने खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना नेमावे, अशी मागणी केली आहे. तसे निवेदन समितीने आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना दिले. त्यांच्या वतीने उपायुक्त अश्विनी सानप यांनी ते स्वीकारले.

प्लास्टीक काडतुसांचा पहिल्यांदाच वापर

ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावरील हल्ला परतवून लावण्यासाठी, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी झाडलेल्या गोळ्या प्लास्टीकच्या होत्या. डीफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशनने(डीआरडीओ) सुमारे २००० साली हिंसक आंदोलनकर्ते, दंगेखोरांना पांगवण्यासाठी प्लास्टीकची काडतुसे तयार केली. त्यानंतर देशभरातील सर्व पोलीस यंत्रणांना प्लास्टीकच्या काडतुसांचा साठा पुरवण्यात आला. महाराष्ट्रात या काडतुसांचा वापर पोलिसांनी केला आहे. मुंबईत मात्र ही काडतुसे पहिल्यांदाच वापरली गेली. पोलीस दलाकडील एसएलआर(सेल्फ लोड रायफल) या अत्यंत भरवशाच्या शस्त्रात ही(७.६२ बोअरची) काडतुसे वापरता येतात. त्यासाठी खास बनावटीच्या शस्त्रांची आवश्यकता भासत नाही. गोळी झाडल्यानंतर रायफलमधून आवाज जशास जसा येतो. फक्त या काडतुसाची क्षमता खऱ्या काडतुसापेक्षा कमी असते. ६० मिटर किंवा त्याहून जास्त अंतरावरून गोळी झाडल्यास ती शरिरात घुसत नाही. वरवरची जखम होते. यात काडतुसाचे बोंड शिश्याऐवजी प्लास्टीकचे असते. शिवाय मागील भागात कमी प्रमाणात दारू ठासलेली असते. जैतापूर अणूप्रकल्पाविरोधात गावकऱ्यांनी छेडलेले उग्र आंदोलनानंतर वातावरण नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी याच प्लास्टीक काडतुसांचा वापर केला होता. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना खऱ्या गोळया झाडाव्या लागल्या.

‘पोलीस ठाणे पेटवून दिले असते..’

या हल्ल्यात ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अण्णासाहेब सोनूरही जखमी झाले आहेत. त्यांच्या गुडघ्यावर पेव्हर ब्लॉक लागल्याने मोठी जखम झाली आहे. सोमवारी आणखी सात आरोपींना अटक केल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला. हे सर्व एमआयएमचे कार्यकर्ते असल्याचेही त्यांनी सांगितले. दंगेखोरांना आवरण्यासाठी पोलिसांनी गोळीबारासह जे सुरक्षिततेसाठी उपाय योजले ते अचूक असल्याचे सोनूर सांगतात. हातावर हात धरून बसलो असतो तर हल्लेखोरांनी कदाचित संपूर्ण पोलीस ठाणेच पेटवून दिले असते, पोलीस प्राणाला मुकले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

शहानवाज यांना गुन्हेगारी पाश्र्वभूमी

ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावरील हल्ल्याप्रकरणी गजाआड झालेले एमआयएमचे नगरसेवक शहानवाज हुसेन यांच्याविरोधात याआधी एकूण चार गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी दोन दंगलींचे, तर दोन हाणामारींचे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.