मालमत्ता करापोटी साडेतीन हजार कोटी थकविले

मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या मोठय़ा थकबाकीदारांनंतर आता निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक, खुली जागा, शासकीय, शैक्षणिक असे सर्वच करबुडवे पालिकेच्या रडारवर आले आहेत. नोटिसांना न जुमानणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तीन लाख २३ हजार ८६१ मुंबईकरांनी थकविलेला ३,६८१.९८ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे.

देशात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला जकात कर बंद करण्यात आला. त्यामुळे मोठे उत्पन्न मिळवून देणाऱ्या मालमत्ता कराच्या वसुलीवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. करनिर्धारण आणि संकलन विभागाने गेल्या महिन्यात ९९१ कोटी ३२ लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कर थकविणाऱ्या १३२ जणांची यादी जाहीर केली होती. त्यांनी कर न भरल्यास मालमत्तेवर जप्ती / अटकावणी, पाणीपुरवठा खंडित करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात तब्बल तीन लाख २३ हजार ८६१ जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. करनिर्धारण आणि संकलन विभागाने २४ विभाग कार्यालयांतील मालमत्ताधारकांची यादी तयार केली असून ‘के-पूर्व’ म्हणजे अंधेरी, जोगेश्वरी परिसरात तब्बल २० हजार २४६ मालमत्ताधारकांनी तब्बल ४२३.३५ कोटी रुपये थकविले आहेत. त्याखालोखाल ‘जी-दक्षिण’ विभागाचा (प्रभादेवी, दादर परिसर) क्रमांक लागत असून या विभागात सात हजार ५० थकबाकीदार असून त्यांनी ४०३.९५ कोटी रुपये थकविले आहेत. ‘एच-पूर्व’ (वांद्रे- पूर्व) विभागात आठ हजार १२२ थकबाकीदारांनी २६०.३६ कोटी रुपये, ‘एल’ विभागातील (कुर्ला) १८ हजार २९१ थकबाकीदारांनी २५४.४४ कोटी रुपये, तर ‘पी-दक्षिण’ विभागातील (गोरेगाव आणि आसपास) १४ हजार ८२४ थकबाकीदारांनी २०७.४९ कोटी रुपये थकविले आहेत.

शहरातील नऊ प्रशासकीय विभागांमध्ये एक हजार १८१ कोटी रुपये, पूर्व उपनगरांतील सहा प्रशासकीय विभागांमध्ये ७६६ कोटी रुपये, तर पश्चिम उपनगरांमधील नऊ प्रशासकीय विभागांमध्ये एक हजार ७३३ कोटी रुपये मालमत्ता कर थकीत आहे.

मालमत्ता कराची देयके सादर मिळाल्यानंतर संबंधितांनी ९० दिवसांत तो पालिकेच्या तिजोरीत जमा करणे बंधनकारक आहे. मात्र ९० दिवसांची मुदत संपुष्टात आल्यानंतर संबंधितांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात आली. पालिका अधिकारी संबंधित थकबाकीदाराशी सुरुवातीला संपर्क साधून संवाद साधतात. त्यानंतर कर भरण्यासाठी स्मरणपत्र पाठविण्यात येते. त्यानंतर २१ दिवसांनी मालमत्ताधारकास नोटीस पाठविण्यात येते. तरीही कर न भरणाऱ्याच्या मालमत्तेचा पाणीपुरवठा खंडित केला जातो. अखेरच्या टप्प्यात मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

विभागवार थकबाकीदार

विभाग       मालमत्ताधारक   थकीत रक्कम (रु.)

‘के-पूर्व’

(अंधेरी, जोगेश्वरी) २० हजार २४६    ४२३.३५ कोटी

‘जी-दक्षिण’

(प्रभादेवी, दादर) ७ हजार ५०      ४०३.९५ कोटी

‘एच-पूर्व’

(वांद्रे- पूर्व)      ८ हजार १२२    २६०.३६ कोटी

‘एल’ (कुर्ला)    १८ हजार २९१   २५४.४४ कोटी

‘पी-दक्षिण’

(गोरेगाव परिसर) १४ हजार ८२४  २०७.४९ कोटी