News Flash

TRP Scam : पार्थ दासगुप्ता यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, पण मुंबई सोडण्यास मनाई

पासपोर्ट न्यायालयात करावा लागणार जमा

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पार्थ दासगुप्ता. (संग्रहित छायाचित्र)

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार पार्थ दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला असून, परवानगीशिवाय मुंबई सोडून जाण्यास मनाई केली आहे.

मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळ्यात बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप पोलिसांनी आरोपपत्रातून केला होता. या प्रकरणी दासगुप्ता यांनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने पार्थ दासगुप्ता यांना दोन लाखांच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर केला. दासगुप्ता यांना परवानगीशिवाय मुंबई सोडून कुठेही जाता येणार नसल्याचे आदेश न्यायालयाने जामीन मंजूर करताना दिले. त्याचबरोबर दासगुप्ता यांना स्वतःचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सहा महिन्याच्या काळात दासगुप्ता यांना प्रत्येक महिन्याला गुन्हे शाखेकडे हजेरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पार्थ दासगुप्ता टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. पार्थ यांनी एआरजी आउटलायर कंपनीचे संचालक आणि रिपब्लिक वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासोबत संगनमताने कट रचून टीआरपी घोटाळा केल्याचा आरोप गुन्हे शाखेने न्यायालयासमोर सादर केलेल्या आरोपपत्रात केलेला आहे. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी  आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पार्थ दासगुप्तांवर काय आहेत आरोप?

पार्थ दासगुप्ता यांनी एआरजीचे संचालक व रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब यांच्याशी संगनमत केले, कट रचला, ‘बार्क’मधील आपल्या पदाचा गैरवापर करून टीआरपी मोजणीची पद्धत व तंत्र बदलले. अन्य वरचढ ठरणाऱ्या वाहिन्यांचे टीआरपी विश्लेषणातून गाळले. विश्लेषण न करताच टीआरपी जाहीर करून रिपब्लिकला वरचढ ठरिवले. प्रतिस्पर्धी वाहिन्यांची गुपिते रिपब्लिकसमोर फोडली, असे आरोप पोलिसांनी दासगुप्ता यांच्यावर ठेवलेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 12:20 pm

Web Title: trp scam bombay high court grants bail to former barc ceo partho dasgupta bmh 90
Next Stories
1 सागरीकिनारा मार्गाचे २५ टक्के काम पूर्ण
2 ज्येष्ठांच्या उत्साहावर अ‍ॅपमुळे विरजण
3 विकास निधीवरून वाद
Just Now!
X