‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी पत्रकार परिषद का घेण्यात आली, पत्रकारांशी संवाद साधणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे का, पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधण्याची काय गरज होती, अशी प्रश्नांची सरबत्ती उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारवर केली. तसेच नुकतेच निलंबित झालेले या घोटाळ्याचे तपास अधिकारी सचिन वाझे आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.
या घोटाळ्याप्रकरणी ‘रिपब्लिक’ वाहिनीची मालकी असलेल्या ‘एआरजी आऊटलियर मीडिया’ या कंपनीने आणि वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्यासह कारवाईपासून संरक्षण देण्याची आणि प्रकरणाचा तपास सीबीआय वा तत्सम तपास यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी त्यांनी केली.
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर मंगळवारपासून या याचिकांवरील नियमित सुनावणीला सुरुवात झाली. त्या वेळी कंपनीतर्फे अॅड्. अशोक मुंदरगी यांनी युक्तिवादाला सुरुवात केली.
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी सद्हेतूने पत्रकार परिषद आयोजित केली नाही असा दावा मुंदरगी यांनी केला. याप्रकरणी कंपनी वा गोस्वामी यांच्यासह कंपनीच्या अन्य कर्मचाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नसताना ‘टीआरपी’ घोटाळ्याचे सारे कुभांड हे केवळ गोस्वामी यांना गोवण्यासाठीच रचण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी पक्षाच्या जवळचे म्हणून चर्चेत असलेले आणि नुकतेच निलंबित झालेले पोलीस अधिकारी वाझे यांना प्रकरणाची जून महिन्यापासूनच माहिती असूनही त्यांनी त्यावेळी काहीच का केले नाही, असा प्रश्न कं पनीतर्फे उपस्थित करण्यात आला. एखाद्या कंपनीला घोटाळ्यात आरोपी कसे केले जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करतानाच कंपनीचे अटक करण्यात आलेले कर्मचारी संशयित असल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे याकडे मुंदरगी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. घोटाळ्याचे तपास अधिकारी असलेले वाझे हेही वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असल्याचा आरोप कंपनीतर्फे करण्यात आला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2021 12:43 am