वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
राजभवनाच्या परिसरातील भटकी कुत्री, मुंगूस यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या आणि कुपोषणामुळे दुबळेपणा आलेल्या मोरांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी सर दोराबजी टाटा ट्रस्टने ४३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देऊ केले आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
राजभवनाच्या परिसरात सध्या १२ मोर आहेत. परंतु मुंगूस व भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे मोरांची संख्या वाढत नाही. मुंगसांची संख्या जास्त वाढली आहे. मुंगूस मोरांची अंडी फोडतात, पिल्लांवर हल्ले करतात, त्यामुळे मोरांची वंशवृद्धीच थांबली आहे.
दुसऱ्या बाजूला जीवनसत्त्वयुक्त अन्नही मिळत नसल्याने मोर कुपोषित असल्याचेही आढळून आले आहे. राज्यपाल विद्यासागर राव स्वत: लक्ष घालून मोरांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या सूचनेनुसार मोरांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी काय उपाययोजना करता येतील, याबद्दलचा प्रस्ताव सादर करण्यास मायव्हेट चॅरिटेबल ट्रस्ट व रिसर्च सेंटर या संस्थेला सांगण्यात आले होते. त्यानुसार संस्थेने राज्यपालांना तसा प्रस्ताव सादर केला आहे.
मोरांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी वन विभागाच्या वतीने मार्गदर्शन व तांत्रिक साहाय्य देण्याची मुनगंटीवार यांनी तयारी दर्शविली. मायव्हेट संस्थेने दिलेल्या प्रस्तावानुसार लागणाऱ्या खर्चासाठी उद्योगांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून आर्थिक सहकार्य मिळविण्याचा राजभवनाचा प्रयत्न होता. त्यानुसार टाटा ट्रस्टने मायव्हेट संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोरांचे संरक्षण, संवर्धन व वैद्यकीय उपचार व्यवस्थापनासाठी ४३ लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

राजभवनाच्या परिसरातील मोरांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकणारे वृत्त लोकसत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आले. त्याची दखल घेऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजभवनला भेट दिली. त्या वेळी राज्यपाल व वन मंत्र्यांनी पशुवैद्यकीय तज्ज्ञांसोबत मोरांचा अधिवास असलेल्या क्षेत्राची पाहणी केली. राजभवनाच्या भोवतालच्या तारेच्या कुंपणाला अडकूनही मोर जखमी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
‘लोकसत्ता’ने २८ नोव्हेंबरच्या अंकात राजभवन परिसरातील मोरांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.