अंधेरीतील घटना

चार वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अंधेरीतील एका प्रसिद्ध शाळेचा संस्थापक विश्वस्त ब्रिलंट पॅट्रिक हेन्री मॉरिस (५७) याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांना खडसावले होते. ब्रलंट फ्रान्स देशाचा नागरिक आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शाळेतच बालिकेवर अत्याचार घडला. मुलीला नीट चालता आणि बसता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर या मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केली होती. तसेच शाळेच्या अधिकृत संकेतस्थळावर असलेले आरोपींचे छायाचित्र पाहून मुलीने त्यांची ओळख पटवली.

त्यानुसार पोलिसांनी ब्रिलंटसह एका शिक्षिकेविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. मात्र त्या वेळी आरोपी ब्रिलंट परदेशात होता. त्याच्याविरोधातील कारवाईला विलंब होत असल्याने अखेर पालकांनी उच्च न्यायालयात याचिका केली. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने पोलिसांना फैलावर घेतले. बालिकेने आरोपींना ओळखले आहे. मुलीचा जबाब आणि तक्रार ही एकमेकास पूरक असताना ८० साक्षीदारांची गरजच काय, असे सवाल पोलिसांना केले होते. अलीकडेच या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांच्याकडे सोपविण्यात आला होता.