सुहास बिऱ्हाडे

सत्य बोलल्याने माझ्यावर टीका होत असेलही. मात्र, मी सत्याचा मार्ग सोडणार नाही आणि अन्यायाविरोधात बोलतच राहीन, असा निर्धार ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी रविवारी व्यक्त केला. झुंडवादी शक्तींविरोधातील लढा सुरू ठेवणार आहे. अशाशक्तींबाबत समाजातील मान्यवरांचे मौन ही शोकांतिका असल्याची खंत फादर दिब्रिटो यांनी व्यक्त केली.

फादर दिब्रिटो पाठीचे दुखणे वाढल्याने संमेलन अर्धवट सोडून उपचारासाठी मुंबईत आले. त्यांच्यावर वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संमेलनाच्या समोरापाला हजर राहता आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. समारोपाचे भाषण त्यांनी आयोजकांना पाठवले. त्याचबरोबर समारोपाच्या दिवशी आपल्या भावना त्यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केल्या. संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात फादर दिब्रिटो यांनी झुंडवादी शक्तींवर हल्ला चढविला होता. त्याबद्दल त्यांच्यावर काही वर्तुळांतून टीका होत आहे. याबद्दल ते म्हणाले, की भूमिका घेणे गरजेचे आहे. पण समाजातील अनेक बुद्धिजीवी, साहित्यिक, विचारवंतांपासून अभिनेत्यांपर्यंत सारे गप्प आहेत, ही शोकांतिका आहे.

देश अस्वस्थ आहे, तरुण बिथरला आहे. तो आता झुंडवादी शक्तींविरोधात गावोगावी रस्त्यावर उतरत आहे. ही सजगता सकारात्मक असल्याचे फादर दिब्रिटो म्हणाले. देशाच्या विविध निवडणुकांमध्ये यामुळेच बदल दिसून येत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

जनतेने आत्मपरीक्षण करावे!

प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांना दोष देता येत नाही. देशात जी परिस्थिती असते तिचा वेध घेऊ न तिचे परीक्षण जनतेने करणे आवश्यक आहे. सर्व गोष्टींचे खापर राज्यकर्त्यांच्या, पुढाऱ्यांच्या डोक्यावर फोडू नये. राज्यकर्त्यांना लोकांनी निवडून पाठवले आहे. आपण लोकशाहीत वावरत असतो. म्हणून आपण जागरूक असले पाहिजे, असे फादर दिब्रिटो म्हणाले.

माजी संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी, देश हिटलरशाहीच्या उंबरठय़ावर नाही, असे फादर दिब्रिटो यांच्या विधानाला कथित शह देणारी भूमिका घेतल्याचे प्रसिद्ध झाले आहे. मात्र एका खासगी वृत्तवाहिनीने त्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचे दिब्रिटो म्हणाले. रविवारी डॉ. ढेरे यांनी मला दूरध्वनी करून याबाबत वस्तुस्थितीचे कथन केले आणि आपण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली, असे त्यांनी सांगितले.

प्रकृतीत सुधारणा

गेल्या काही दिवसांपासून फादर दिब्रिटो यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होत आहे. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा आग्रह केला होता. मात्र संमेलन असल्याने औषधांवर निभावून नेल्याचे ते म्हणाले. संमेलनाच्या समोरापाला हजर राहण्याची त्यांची खूप इच्छा होती, पण डॉक्टरांनी वेदनाशामक औषधांची मात्रा वाढवता येणार नाही, असे सांगितल्याने त्यांना मुंबईला परतावे लागले. रविवारी त्यांच्या सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचण्या करण्यात आल्या. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर उपचार केले जाणार आहेत. प्रकृतीत सुधारणा होत असली, तरी सध्या त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून आणखी काही दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे.

‘मी कृतज्ञ’

माझ्या ध्यानीमनी नसताना संमेलनाध्यक्षासारखे मानाचे पद मला देण्यात आले. एका शेतकऱ्याच्या मुलाचा हा मोठा सन्मान आहे. यासाठी मी साहित्य महामंडाळाबाबत कृतज्ञता व्यक्त करतो, अशी भावना संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटो यांनी समारोपासाठी पाठवलेल्या आपल्या संदेशपत्रात व्यक्त केली. फादर दिब्रिटो यांचे संदेशपत्र रामचंद्र कालुंखे यांनी वाचून दाखवले. आज डिजिटल क्रांतीचे दिवस आहेत. हवी ती महिती सहज उपलब्ध होत आहे. परंतु माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान हवे असेल तर पुस्तके वाचावी लागतील. ही पुस्तके व्यक्तीला जीवनाचे आगळे वेगळे दर्शन घडवत असतात, असेही संमेलनाध्यक्षांनी आपल्या संदेशपत्रातून सांगितले.