ठाणे स्थानकात पहिल्या प्रयोगासाठी मध्य रेल्वेचा विचार; गर्दीवरील नियंत्रणासाठी प्रयत्न

एल्फिन्स्टन रोड स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेकडून गर्दी नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून रेल्वे स्थानकात प्रवाशांची संख्या ओळखणारे अत्याधुनिक असे ‘मॅट’ (चटई) बसविण्याचा विचार केला जात आहे. या मॅटवरून जाणाऱ्या प्रवाशांची मोजदाद होईल आणि त्याप्रमाणे  स्थानकात होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेला उपाययोजना करता येतील, अशा प्रकारच्या पहिल्या प्रयोगासाठी ठाणे स्थानकाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड स्थानकात पादचारी पुलाच्या पायऱ्यांवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत काही प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागला. यात रेल्वे प्रशासन विशेषत: रेल्वे सुरक्षा दलाला गर्दी नियंत्रित करता आलीच नाही. त्यामुळे बरीच टीका रेल्वे सुरक्षा दलावर झाली. अखेर अशा दुर्घटना अन्य स्थानकांतही होऊ नये यासाठी मध्य रेल्वेकडून उपाययोजना करण्यात येऊ लागल्या. सध्या मध्य रेल्वेवरील १३ स्थानकांत तर गर्दीवर नियंत्रणासाठी अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दल, तिकीट तपासणी, लोहमार्ग पोलीस ठेवण्यात आले आहेत. पादचारी पुलांवरून चालताना किंवा लोकलमध्ये चढताना धक्काबुक्की होऊ नये यासाठी प्रवाशांना रांगेत चालण्याचे आवाहन करणे, लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी रांग लावणे इत्यादी उपाय केले जात आहेत. १३ स्थानकांबरोबरच अन्य स्थानकांतही गर्दीवरील नियंत्रणाचे उपाय केले जाणार आहेत. यानंतर आता प्रवाशांची मोजदाद करणारे आधुनिक असे मॅट बसविण्याचा विचार मध्य रेल्वेने सुरू केला आहे. रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे मॅट रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वाराजवळ किंवा फलाटांवर किंवा पादचारी पुलांवर बसविले जातील. रेल्वे स्थानकात येणाऱ्या किंवा जाणाऱ्या प्रवाशांचा या मॅटवर पाय पडताच त्यांची मोजदाद होईल. रेल्वे स्थानकात नेमक्या कोणत्या भागातून सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात, हे ओळखून त्या ठिकाणी रेल्वेकडून उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे गर्दी नियंत्रित राखण्यासही मदत मिळतानाच चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटनाही रोखल्या जाऊ शकतात. जर स्थानकातील एखाद्या भागातून प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी प्रवेश करत असतील किंवा चेंगराचेंगरीचा धोका होऊ शकतो, हे ओळखण्यासाठीही मॅटमध्ये सेन्सर असतील आणि त्यामधून अलर्टही रेल्वे सुरक्षा दलाच्या यंत्रणेला मिळेल, असेही सांगितले.

अ‍ॅलर्टप्रयोग फसल्यानंतर मॅट

सीएसएमटी, दादर या स्थानकांत मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडून चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार होते. यात प्रमाणापेक्षा गर्दी झाली तर हे कॅमेरे रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षात अलर्ट देतील. मात्र रेल्वे स्थानकात मोठय़ा प्रमाणात होणारी गर्दी यामुळे कॅमेऱ्यांमध्ये ही गर्दी टिपताच सतत अलर्ट मिळत असे. प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत असलेला प्रयोग फसला. त्यानंतर आता मॅट बसविण्यावर विचार केला जात आहे.