दोन लाख रुग्णांची नव्याने नोंद, देशाच्या अर्थव्यवस्थेचे २० हजार कोटींचे नुकसान

सध्या क्षयरोगाचा (टीबी) प्रसार मोठय़ा प्रमाणात होत असून, देशात प्रत्येक वर्षी २९ लाख जणांना नव्याने या संसर्गजन्य रोगाची लागण होत आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी (२०१७ मध्ये ) दोन लाख नव्या क्षयरोग रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील १ हजार रुग्णांना पुरेसा उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले असून, पत्रामध्ये जास्तीत जास्त रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केल्याबद्दल राज्यातील क्षयरोग कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

खचाखच गर्दीने भरलेल्या लोकलमधून प्रवास करणे, दाट लोकवस्ती, कोंदट घरे, प्रदूषण, कुपोषण, अपुरे उपचार यांसह विविध कारणांमुळे क्षयरोग मोठय़ा प्रमाणावर पसरत आहे. महाराष्ट्रामध्ये सापडलेल्या क्षयरोगाच्या रुग्णांपैकी ६६ टक्के क्षयरोगाचे रुग्ण हे मुंबई शहरातील असून, हे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबई शहरात २०१७ मध्ये ४ हजार ३७४ नव्या क्षयरोग रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

गरीब नागरिकांमध्ये पुरेसे उपचार आणि कुपोषण यामुळे क्षयरोगाचे प्रमाण जास्त असून, देशात प्रत्येक वर्षी सरासरी ४.२० लाख गरीब नागरिकांना क्षयरोगाची बाधा होत आहे. क्षयरोगामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे वार्षिक २० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान होत असल्याचे मोदींनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. २०२५ पर्यंत देशातून क्षयरोग हद्दपार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, जास्तीत जास्त रुग्णांना शोधून काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाला आवश्यक ते तांत्रिक आणि आर्थिक मदत देण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचे पत्रात म्हटले आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपेक्षाच

क्षयरोग नष्ट करण्यासाठीच्या केंद्राच्या मोहिमेमध्ये सुधारित क्षयरोग नियंत्रण कत्राटी कर्मचाऱ्यांचे योगदान मोठय़ा प्रमाणावर आहे. मुंबईसह राज्यामध्ये आरोग्य केंद्रात क्षयरोग रुग्ण शोधणे, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुमारे दोन हजारपेक्षा अधिक कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन काम करत असल्याचे चित्र आहे. क्षयरोगींवर उपचार करताना चुकीने त्यांनाही क्षयरोग होण्याचा धोका असताना सरकारने त्यांना कोणत्याही प्रकारे आरोग्य विमा अथवा जोखीम भत्ता दिलेला नाही. सुमारे १८ वर्षांपासून काम करत असतानाही कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबतची ‘फाइल’ अजूनही पुढे सरकत नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

प्रवास जरा जपून..

खचाखच भरलेल्या लोकलच्या गर्दीतून प्रवास करताना क्षयरोग होण्याची शक्यता वाढल्याची भीती या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एका क्षयरुग्णाने पुरेशी काळजी न घेतल्याने त्याच्या जवळील तब्बल १२ जणांना क्षयरोगाची लागण होऊ शकते.

केंद्र सरकारने क्षयरोग हद्दपार करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली असून, त्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. मिळालेल्या निधीपैकी आतापर्यंत ७० टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. नवीन रुग्णांना आवश्यक ते उपचार, औषधे देऊन रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंत काळजी घेण्यात येत आहे.

डॉ. संजीव कांबळे, सहसंचालक (क्षय व कृष्ठ), पुणे