शैलजा तिवले

रुग्णांमध्ये देशभरात ५० टक्क्यांनी वाढ; राज्यातील रुग्णांची संख्या नऊ हजारांहून अधिक

देशभरात औषधांना दाद न देणाऱ्या (डीआर) क्षयरोगाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे चित्र केंद्रीय क्षयरोग अहवालातून स्पष्ट झाले आहे. देशभरात डीआर क्षयरुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी वाढली आहे आणि यातील २० टक्के रुग्णांना उपचार मिळू शकलेले नाहीत. राज्यात या रुग्णांची संख्या नऊ हजारांहून अधिक असून यातील १६ टक्के रुग्णांपर्यंत उपचार पोहचू शकलेले नाहीत.

क्षयरुग्ण एक किंवा त्याहून अधिक औषधांना प्रतिसाद देत नसल्यास त्याला डीआर (एमडीआर किंवा एक्सडीआर) क्षयरोग झाल्याचा निष्कर्ष चाचण्यांद्वारे काढला जातो. २०१७ मध्ये देशभरात ३८ हजार ६०५ डीआर क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद झाली. एकाच वर्षांत ही संख्या जवळपास ५० टक्क्यांनी वाढून ५८ हजार ३४७ वर पोहचली आहे. राज्यातही हीच परिस्थिती आहे. राज्यात २०१७ मध्ये ८ हजार ४६५ डीआर क्षयरुग्ण आढळले. २०१८ मध्ये यामध्ये १६ टक्क्यांनी वाढ होऊन रुग्णसंख्या ९ हजार ८९५ वर गेली आहे.

डीआर क्षयरोग धोकादायक असून यावर तातडीने उपचार सुरू होणे गरजेचे आहे. तसेच क्षयरुग्णाच्या थेट संपर्कातील व्यक्तींमध्ये संसर्ग पसरू नये यासाठी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक असते. मात्र डीआरच्या रुग्णांवर उपचार सुरू करण्यामध्ये क्षयरोग विभागाला पुरेसे यश आलेले नाही. देशभरात २०१७ मध्ये नोंद झालेल्या एकूण डीआर क्षयरुग्णांपैकी ७ टक्के रुग्ण उपचारापासून दूर होते. २०१८ मध्ये मात्र हे प्रमाण २० टक्क्यांवर पोहचले आहे. राज्यात गेल्यावर्षी क्षयरोग विभाग एकूण डीआर क्षयरुग्णांपैकी केवळ १ टक्के रुग्णांपर्यंत पोहचू शकले नव्हते. परंतु २०१८ मध्ये १६ टक्के रुग्णांना उपचार मिळालेले नाहीत.

देशभरात डीआर क्षयरोग केंद्रांची संख्या २२२ वरून गेल्यावर्षी ६४३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. २०१७ मध्ये राज्यात १७ केंद्र होती. गेल्यावर्षभरात ही संख्या ५० वर गेली आहे.

डीआर क्षयरुग्णांचा पाठपुरावा करणे अडचणीचे

डीआर क्षयरोग केंद्रासह चाचणी करणाऱ्या सीबीनॅट यंत्रणाही वाढलेल्या आहेत. त्यामुळे निदान मोठय़ा प्रमाणावर केले जात आहे. परिणामी, डीआर क्षयरुग्णांची संख्या वाढली आहे. परंतु इतक्या मोठय़ा प्रमाणावर निदान झालेल्या रुग्णांच्या उपचारावर देखरेख ठेवण्यात अडचणी येत आहे. यातील बहुतांश रुग्ण हे मुंबई शहरात आहेत. मुंबईत स्थलांतर हा मोठा प्रश्न आहे. यामुळे अनेकदा रुग्ण उपचार सुरू करतात, परंतु कालांतराने दुसरीकडे जात असल्याने त्यांचा पाठपुरावा करणे शक्य होत नाही. मुंबईसारख्या शहरात इतर राज्यांतूनही रुग्ण उपचारासाठी म्हणून येतात, परंतु ते पुन्हा परत गेल्यानंतर त्यांचा पाठपुरावा कसा ठेवावा, हीदेखील समस्या आहे. डीआर क्षयरुग्णांचा पाठपुरावा करून उपचारावर देखरेख ठेवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

– डॉ. पद्मजा जोगेवार, राज्य क्षयरोग विभागप्रमुख