कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा पार

मुंबई, कधी पर्यावरणवाद्यांचा विरोध तर कधी राजकीय हस्तक्षेप, कधी न्यायालयीन प्रश्नाचा भडिमार तर कधी प्रकल्पग्रस्तांचा आक्षेप अशा विविध आक्षेप आणि आरोपांच्या वादात सापडलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाने सोमवारी महत्त्वाचा टप्पा पार पाडला. या भुयारी मार्गाची बांधणी करणारे बहुप्रतीक्षित टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) अखेर आज मुंबईत दाखल झाले असून प्रकल्पातील बहुतांश अडथळेही दूर झाले आहेत. टीबीएमची तांत्रिक प्रक्रिया महिनाभरात पूर्ण झाल्यानंतर दिवाळी संपताच या भुयारी खोदकामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.

भविष्यात मुंबईत एक लाख कोटी रुपये खर्चून विविध ११ मार्गाच्या माध्यमातून महानगर प्रदेशात १७२ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे उभारले जाणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे तो कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा पूर्णत: भुयारी मार्ग. या मार्गात आतापर्यंत अनंत अडचणी आल्या असल्या, तरी त्यावर मात करत राज्य सरकारने सोमवारी या मार्गाच्या कामातील महत्त्वाचा टप्पा पार केला. मेट्रो जाण्यासाठी मुंबईच्या भूगर्भात बोगदा तयार केला जाणार आहे. बोगदा तयार करण्यासाठी शहरात १७ टीबीएम आणले जाणार आहेत. यातील पहिले टीबीएम सोमवारी मुंबईच्या बंदरात दाखल झाले आहे. आता टप्प्या-टप्प्याने पुढील सर्व टीबीएम शहरात दाखल होतील.

मुंबई मेट्रो-३ ही मार्गिका कुलाबा-वांद्रे-सीप्झ यांना जोडणारी असून ती पूर्णत: भुयारी असणार आहे. या मार्गात एकूण २७ स्थानके असणार आहेत. प्रत्यक्ष मार्ग ३३.५ किमीचा असला तरी या प्रकल्पासाठी ५१ किमीचा भुयारी मार्ग खोदला जाणार आहे. हा भुयारी मार्ग तयार करण्यासाठी टीबीएमचा वापर केला जाणार आहे.  मुंबईत दाखल झालेले ‘टीबीएम’ विविध सुटय़ा भागांमध्ये असणार आहे. पाच दिवसांनी माहीममधील नयानगर येथील खड्डय़ाजवळ नेले जाणार आहेत. तेथून ते भाग खड्डय़ामध्ये सोडले जातील. खड्डय़ात ४५ दिवसांमध्ये या भागांची जोडणी करून ‘टीबीएम’द्वारे ऑक्टोबरच्या चौथ्या आठवडय़ात बोगदा खोदण्याच्या कामास सुरुवात होईल.  या यंत्रांच्या मदतीने दोन वर्षांमध्ये बोगद्याचे काम पूर्ण होईल.