‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या ‘मेट्रो-३’च्या पाली मदान ते विमानतळ टी-२ या मार्गावरील जमिनीअंतर्गत भुयार करण्यासाठी वापरण्यात येणारे भुयार खोदाई यंत्र (टनेल बोअरिंग मशीन) मरोळ येथे आणण्यात आले आहे. येथील पाली मैदानात तयार केलेल्या मोठय़ा विवरात या यंत्राच्या सुटय़ा भागांची जोडणी केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष भुयारी मार्गाच्या खोदकामाला सुरुवात होईल.

‘मुंबई मेट्रो-३’च्या मार्गावर एकूण २७ भुयारी स्थानके असतील. हा मार्ग ३३.५ किलोमीटरचा असेल. मात्र त्यासाठी ५१ किलोमीटरचा भुयारी मार्ग खोदला जाईल. सध्या या खोदकामाला मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली असून याकरिता खोदाई यंत्राचा वापर केला जात आहे. यासाठी शहरात १७ यंत्रे आणली जातील. यापैकी काही यंत्रे शहरात आणली आहेत.

भुयार खोदाई यंत्र जमिनीत सोडण्यासाठी कफ परेड, आझाद मैदान, विज्ञान केंद्र, नयानगर, सिद्धिविनायक, बीकेसी, विद्यानगरी, सहार, विमानतळ टी-२, पाली मैदान आणि मरोळ नाका या ११ ठिकाणी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत.

माहीम नयानगर येथे दहा मीटर भुयाराचे खोदकाम काम पूर्ण केले आहे. मरोळ येथील खोदाई यंत्राच्या सुटय़ा भागांना जोडणीस किमान ३५ दिवसांचा अवधी जाईल, अशी माहिती मेट्रो प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.