गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत काम

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोना संसर्गामुळे वाढलेला खर्च आणि करवसुलीला लागलेली घरघर अशी परिस्थिती असतानाही मुंबई महापालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बोगद्यांचे खोदकाम करण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून अर्ज मागविण्याची तयारी सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर या बोगद्यांचे काम पुढील वर्षी सुरू करण्याचा संकल्पही प्रशासनाने सोडला आहे.

पश्चिम उपनगरवासीयांना मुलुंडला व पूर्व उपनगरवासीयांना गोरेगाव येथे जाण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागतो. त्यामुळे संबंधित रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यात वाहनचालकांचा तासन्तास खोळंबा होता. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच पूर्व-पश्चिम उपनगरांमध्ये कमी वेळेत जाता यावे या उद्देशाने मुंबई महापालिकेने ३८०० कोटी रुपये खर्चाचा गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला.

एकूण १२.२ किलोमीटर लांबीचा हा रस्ता बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाईल. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या माहितीला दुजोरा दिला. ‘गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी वनसंपदेला धक्का न लावता उद्यानात दोन बोगदे खोदण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कामासाठी इच्छुक कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे काम पुढील वर्षी सुरू करण्याचा प्रयत्न आहे,’ असे चहल यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पर्यावरणविषयक परवानगी पालिकेला मिळाली आहे. केवळ वनविभागाची ‘ना हरकत’ अद्याप पालिकेला मिळालेली नाही. जागा हस्तांतरित केल्यानंतर वर्षांअखेपर्यंत वनविभागाकडून ‘ना हरकत’ मिळेल असा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. बोगदा खोदण्याचे काम लवकर सुरू व्हावे यादृष्टीने पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. हे काम करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार कंपनीची नियुक्ती करण्यात येईल. पुढील वर्षी हे काम सुरू होईल, असा आशावाद पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

जागा हस्तांतरित केल्यानंतर मार्ग मोकळा

पालिकेला बोगदे खोदण्यासाठी राष्ट्रीय उद्यानातील १९.४३ हेक्टर जागेची आवश्यकता होती. पालिकेने चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगतच्या मौजे गोंड मोहाडी आणि मौजे वासनविहार गावातील जागा खरेदी करून वनविभागाला हस्तांतरित केली आहे.