कमी किमतीत विकण्यास व्यापाऱ्यांचा विरोध
किलोमागे डाळीचा दर १०० रुपयांपर्यंत आल्याचा राज्य सरकारचा दावा पुन्हा एकदा खोटा ठरला आहे. किरकोळ बाजारात डाळ १८० रुपये किलोने विकली जात आहे. घाऊक बाजारातील तूरडाळीचा दर १५५ रुपये, तर किरकोळ बाजारात ती १८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
चढय़ा दराने डाळ विकत घेऊन ती दीडशे रुपयांच्या खाली विकणे शक्य नसल्याची ठाम भूमिका घाऊक व्यापाऱ्यांनी घेतली आहे. याचा मोठा फटका दिवाळीत ग्राहकांना बसला आहे.
किरकोळ व्यापाऱ्यांनी चढय़ा दराने डाळीचा साठा करून ठेवल्याने ते कमी किमतीत विकण्यास तयार नाहीत. तूरडाळीएवढीच उडीद डाळही महाग आहे. तिचा घाऊक बाजारातील दर १५० रुपये तर किरकोळ बाजारात किलोमागे १६० रुपयांना ती विकली जात आहे.
काही दिवसांपूर्वी तूरडाळ किलोमागे २२० दराने विकली जात होती. त्यानंतर काही प्रमाणात स्वस्त झाली.
राज्य सरकारने साठेबाजांच्या विरोधात कारवाई हाती घेतल्यानंतरही तूरडाळ महागाईची पायरी उतरण्यास तयार नाही.
किरकोळ व्यापाऱ्यांवर सरकारचे कोणतेही बंधन नाही. मर्यादेपेक्षा जास्त डाळीचे साठे करून काही व्यापाऱ्यांनी गुन्हा केला आहे. त्यामुळे सरकार सांगेल त्या भावात त्यांना ती जप्त केलेली डाळ विकावी लागणार असल्याने बाजारात डाळीच्या दराबाबत मोठय़ा प्रमाणात तफावत आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी लावलेल्या केंद्रावर ही डाळ शंभर रुपयांना विकत मिळत असली तरी किरकोळ बाजारातील कोणत्याही दुकानात ती १४० ते १८० रुपये किलो किमतीच्या खाली मिळत नाही. डाळींचे बाजार हा सध्या आयात डाळीवर अवलंबून असल्याने देशी उत्पादन वाढल्याशिवाय ही दरवाढ कमी होणे शक्य नाही, असे एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी सांगितले.