|| अक्षय मांडवकर

डहाणूतील शुश्रूषा केंद्रामध्ये १२ जखमी समुद्री कासव दाखल

डहाणू आणि पालघर जिल्ह्य़ांतील समुद्रकिनाऱ्यांवर जखमी अवस्थेतील १२ समुद्री कासवांना डहाणूतील कासवांच्या शुश्रूषा केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. कासवांवर उपचार करणारे महाराष्ट्रातील एकमेव केंद्र डहाणू येथे आहे. मात्र वनविभागाचे सहकार्य असूनही उपचाराकरिता आवश्यक असणाऱ्या यांत्रिक साधनांची कमतरता केंद्रामध्ये आहे. एक्स-रे मशीन, जलशुद्धीकरण यंत्रणा अशा साधनांच्या अभावामुळे कासवांवर उपचार करून त्यांचे संवर्धन करणे कठीण होत आहे.

पावसाळ्याला सुरुवात झाल्याने जोरदार लाटांच्या माऱ्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर डॉल्फिन, देवमासा आणि सागरी कासवांसारखे सागरी जीव जखमी किंवा मृत अवस्थेत येत आहेत. गुरुवारी उरण किनाऱ्याला मृतावस्थेत लागलेल्या महाकाय ब्ल्यू व्हेलचे उदाहरण ताजे आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या दोन आठवडय़ांत डहाणू आणि पालघर येथील समुद्रकिनाऱ्यांवरून बचावलेल्या १२ सागरी कासवांना डहाणूतील ‘सी-टर्टल ट्रीटमेंट अ‍ॅण्ड ट्रान्झिट सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले आहे. तर मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयामधील एक कासव सध्या या केंद्रामध्ये उपचार घेत आहे. वनखात्याच्या सहकार्याने येथील ‘वाइल्ड लाइफ कॉन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन’ या संस्थेतर्फे या केंद्राचे काम पाहिले जाते. गेल्या वर्षी केंद्रामध्ये दाखल झालेल्या सुमारे ३५ कासवांपैकी १५ कासवांचे प्राण वाचवून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले होते. यंदा दाखल झालेल्या १२ कासवांपैकी दोन कासवे मृतावस्थेत स्थानिकांना सापडली आहेत. मत्स्यालयातील ग्रीन सी प्रजातीचे कासव वगळता दाखल करण्यात आलेली सर्व कासवे ऑलिव्ह रिडले या प्रजातीची आहेत. त्यांना वाधवान, नरपाड, चिखली, धाकटी डहाणू आणि पालघर येथील किनाऱ्यांवरून वाचविण्यात आले आहे.

मात्र उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामग्रीच्या अभावाने कासवांवर उपचार करणे कठीण झाले आहे. उपचारासाठी दाखल होणाऱ्या कासवांच्या शरीराची अंतर्गत तपासणी करण्यासाठी एक्स रे मशीनची आवश्यकता असते. कारण बऱ्याचवेळा मासेमारीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी गळ कासवांच्या शरीरात अडकून राहतात. त्यामुळे केंद्राला एक्स रे मशीनची गरज असून सोबतच जलशुद्धीकरण यंत्रणेची आवश्यकता आहे.

प्रतिवर्षी केंद्रामध्ये सुमारे ३० कासवांना दाखल केले जात असल्याने त्यांना दोन भूमिगत टाक्यांमध्ये ठेवले जाते. त्या टाक्यांमध्ये ओतल्या जाणाऱ्या समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र आवश्यक असल्याची माहिती डहाणूचे मानद वन्यजीव रक्षक आणि ‘वाइल्ड लाइफ कॉन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन’चे संस्थापक सदस्य धवल कनसारा यांनी दिली. केंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांची माहिती वन विभागाला दिल्याचे त्यांनी सांगितले.