सहअभिनेत्रीला मोबाईलवरून अश्लील चित्रफीत पाठवून तिचे मानसिक शोषण केल्याच्या आरोपावरून एका हिंदी मालिकेत भूमिका साकारणाऱया साई बल्लाळ या अभिनेत्याला पोलीसांनी अटक केली. न्यायालयाने साई बल्लाळला ३० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सहअभिनेत्रीचा विनयभंग केल्याचा बल्लाळवर आरोप असल्याचे बोरीवलीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणाजी सावंत यांनी सांगितले. बोरीवली परिसरात राहणारी ही अभिनेत्री एका मालिकेत काम करते. त्यावेळी तिची ओळख बल्लाळ याच्याशी झाली. ओळख झाल्यानंतर बल्लाळ तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. मार्च आणि एप्रिल महिन्यात त्याने त्याच्या मोबाईलवरून तिच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ क्लिप पाठविली होती. यानंतरही तो सातत्याने तिच्या मोबाईलवर अश्लील क्लीप पाठवत होता. त्यानंतर संबंधित महिलेने बोरिवली पोलीस ठाण्यात गुणाजी सावंत यांची भेट घेऊन त्यांना या प्रकाराबद्दल माहिती दिली. या प्रकरणाचा तपास केल्यावर पोलीसांनी बल्लाळविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला. बुधवारी संध्याकाळी त्याला अटक करण्यात आली.