विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या जनमत चाचण्यांमध्ये राज्यात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीची पिछेहाट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने सत्ताधारी वर्गात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील कटुता कमी होऊन एकत्रित काम करावे, असे राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुचविले.
राज्यात आता निवडणुका झाल्यास सत्ताधाऱ्यांची पिछेहाट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. विरोधक कमजोर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील भांडणात विरोधकांचा फायदा होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. दोन्ही पक्षांनी एकत्रित काम केल्यास त्याचा राजकीय लाभ उभयतांना मिळेल. यापुढे दोघांनीही एकत्रित काम करावे व आपल्यातील वाद जनतेत उघड होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. जनमत चाचण्यांच्या निष्कर्षांमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये साहजिकच अस्वस्थता पसरली आहे. विशेषत: राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.