18 September 2019

News Flash

टीव्ही स्क्रीनच्या ‘मापा’तही पाप!

‘सीजीएसआय’ने केलेल्या पाहणीत तब्बल ५२.६३ टक्के टीव्हीची स्क्रीन ही कंपन्यांनी दावा केल्यापेक्षा कमी होती.

नामांकित कंपन्यांच्या टीव्हींचा प्रत्यक्ष आकार कमी; आकार मोजून घेण्याची सीजीएसआयची ग्राहकांना सूचना

भाजीपाला, धान्य यांच्या वजनात फेरफार करून ग्राहकांची फसवणूक करण्याचा फंडा जुना. मात्र आपण घरात घेतलेला ४० इंचाच्या टीव्हीची स्क्रीन खरोखरीच तेवढीच आहे का हे अक्षरश: मोजपट्टीच्या साह्यने मोजून घ्या. कारण भाजी बाजारात होणारे ‘मापात पाप’ ब्रँडेड टीव्हींच्या स्क्रीनच्याही आकारातही दिसून आले आहे. यामुळे टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी स्कीनचा आकार मोजून घ्यावा असे आवाहन ‘भारतीय ग्राहक मार्गदर्शन सोसायटी’ने (सीजीएसआय) केले आहे.

‘सीजीएसआय’ने केलेल्या पाहणीत तब्बल ५२.६३ टक्के टीव्हीची स्क्रीन ही कंपन्यांनी दावा केल्यापेक्षा कमी होती. तर १.७५ टक्के टीव्हींची स्क्रीन दावा केल्यापेक्षा जास्त होती आणि ४६.४९ टक्के टीव्हींची स्क्रीन ही सांगितलेल्या मापात होती. टीव्ही स्क्रीनच्या ‘मापात पाप’ करणार्यांमध्ये बडय़ा ब्रँडस्चाही समावेश असल्यामुळे ग्राहकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ग्राहकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या ‘सीजीएसआय’ या संस्थेकडे एक ग्राहक त्याला टीव्हीची स्क्रीन लहान मिळाल्याची तक्रार घेऊन गेला. त्यावेळेस संस्थेतर्फे कंपनीने केलेला दावा आणि ग्राहकाकडे असलेल्या टीव्हीच्या स्क्रीनच्या आकाराचा ताळमेळ घालून पाहिला. त्यात तब्बल पाच इंचाची तफावत आढळून आली. याबाबत विक्रेत्याकडे चौकशी केली असता विक्रेता म्हणाला की, स्क्रीनचे माप घेताना बाजूच्या फ्रेमचेही माप घ्यावे. पण नियमांनुसार स्क्रीनचा आकार मोजताना केवळ काचेचा भागच गृहीत धरला जातो. याबाबत संस्थेने कंपनीशी संपर्क साधला आणि ग्राहकाला त्याला दिलेल्या चुकीच्या उत्पादनाचे पैसे परत केले. यानंतर संस्थेने विविध प्रकारच्या १२२ टीव्हीची पाहणी केली. यातून आलेल्या निष्कार्षांमध्ये ही धक्कादायक बाब समोर आल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्रीराम दीक्षित यांनी स्पष्ट केले.

ग्राहकांनी हे लक्षात ठेवावे!

टीव्ही स्क्रीनचा आकार हा आपल्याला संचावर दिसणार्या काचेचाच भागाचाच असायला हवा. यामध्ये आजूबाजूची फ्रेम अथवा स्पीकरचा भाग गृहीत धरला जात नाही. टीव्ही खरेदी केल्यावर ग्राहकांनी मोजपट्टीने स्क्रीनचा आकार मोजून घ्यावा. हा आकार मोजताना तिरक्या टोकांमध्ये मोजावा अशी माहिती दीक्षित यांनी दिली. यामध्ये जर ग्राहकांना काही तफावत आढळली तर ग्राहकांनी mah.helpline@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा १८००-२२-२२६२ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी असेही दीक्षित यांनी नमूद केले.

First Published on November 12, 2016 1:57 am

Web Title: tv size issue