बालभारतीच्या बारावीच्या पुस्तकांची विक्री यंदा जवळपास पन्नास टक्क्य़ांनी घटली असून बालभारतीच्या पुस्तकांसारख्याच हुबेहुब दिसणाऱ्या बनावट पुस्तकांची विक्री आणि पुस्तकांच्या पीडीएफ डाऊनलोड करण्याचे वाढलेले प्रमाण यांचा फटका बालभारतीला बसल्याचे समोर आले आहे.

यंदा बारावीचा अभ्यासक्रम बदलला. करोना प्रादूर्भावाच्या काळातही बालभारतीतील कर्मचारी, शैक्षणिक, तांत्रिक विभागातील अधिकारी यांनी खूप परिश्रम करून बाजारात पुस्तके उपलब्ध केली. पुस्तकांच्या प्रतिक्षेत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. जून अखेरीस बालभारतीची पुस्तके उपलब्ध झाली. गेल्यावर्षी अकरावीची पुस्तके बदलली. त्यावेळी सर्व विषयाच्या पुस्तकांच्या मिळून साधारण ७८ लाख प्रती विकल्या गेल्या. हेच विद्यार्थी यंदा बारावीत गेले. अकरावीपेक्षा बारावीच्या पुस्तकांची विक्री काहीशी अधिक होते. मात्र यंदा बारावीच्या नव्या पुस्तकांच्या अद्यापपर्यंत ३८ लाख प्रतींचीच विक्री झाली आहे. अनेक जिल्ह्य़ांमध्ये बनावट पुस्तकांची विक्री होत असल्यामुळे बालभारतीच्या पुस्तकांचा खप कमी झाल्याचे बालभारतीतील सूत्रांनी सांगितले.

ऑनलाइन पुस्तके

बालभारती गेल्या काही वर्षांपासून पाठय़पुस्तके पीडीएफ स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देते. यंदाही पाठय़पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. यंदा करोनाच्या प्रादूर्भावामुळे पीडीएफ स्वरूपातील पुस्तके पाहणाऱ्यांचे प्रमाण वाढले. मात्र, तरीही पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल हा प्रत्यक्ष छापील प्रती घेण्याकडे अधिक असतो. त्यामुळे पुस्तकांच्या विक्रीत फरक पडला तरी तो १० ते १५ टक्केच पडणे अपेक्षित आहे, असे विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

घडले काय ?

बारावीची पुस्तके बाजारात उपलब्ध झाली. त्याच दरम्यान मराठवाडय़ातील काही जिल्ह्य़ांमध्ये हुबेहूब अशी बनावट पुस्तके बाजारात मिळत असल्याची बालभारतीतील सूत्रांनी सांगितले. विक्रेत्यांना या प्रकाशकांकडून अधिक मोबदला मिळत असल्यामुळे विक्रेते बनावट पुस्तके विकत असल्याचे बालभारतीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीसात तक्रार..

बनावट पुस्तकांच्या विक्राची बाब गेल्या महिन्यात उघडकीस आली. काही पालक, ग्राहक संघटनांनी याबाबत बालभारतीकडे तक्रार केली. बालभारतीच्या मराठवाडयातील भांडारांनी याबाबत आपल्या मुख्य कार्यालयाला पत्र लिहून पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर याबाबत चौकशी करण्यासाठी कागदाची जाण असलेले निर्मिती विभागातील अधिकारी, विधि अधिकारी यांना पाठवण्याची विनंती केली.