रिकामे सिलिंडर भरून घेण्यासाठी झुंबड; कामगारांचा तुटवडा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या संचारबंदीनंतर नागरिकांनी ठिकठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली. दुसरा दिवस उजाडताच नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर गराडा घातला.

संचारबंदीतही जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध राहतील, असे दिलासा देणारे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी समाजमध्यामांवरून केले. परंतु त्यानंतर रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी लागू केलेल्या २१ दिवस संचारबंदीमुळे आता जीवनावश्यक गोष्टींचे काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला. त्यानंतर जीवनावश्यक गोष्टींचा साठा करावा या उद्देशाने लोकांनी स्थानिक बाजारात प्रचंड मोठय़ा प्रमाणात गर्दी केली. तर जेवण शिजवण्यासाठी लागणारा गॅस सिलिंडर मिळेल की नाही या संभ्रमात लोक होते. त्यामुळे बुधवारी दिवस उजाडताच लोकांनी आपले रिकामे सिलिंडर घेऊन गॅस एजन्सी बाहेर गराडा घातला. एक दोन ठिकाणी नव्हे तर मुंबईतल्या सर्वच भागात ही परिस्थिती पाहायला मिळाली. अनेकजन तर सकाळी ८ पासूनच रांग लावून उभे होते. अखेर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. बऱ्याच ठिकाणी एक मीटरचे अंतर ठेऊन लोकांना उभे करण्यात आले तर काही ठिकाणी मात्र संख्या जास्त असल्याने लोकांचा जमाव तयार झाला. साधारण दुपापर्यंत ही परिस्थिती कायम होती.

घाबरलेल्या अनेकांनी गॅस सिलिंडर साठवून ठेवावा म्हणून काळय़ा बाजारात अधिकचे पैसे देऊन एखादा सिलिंडर खरेदी करता येतो का याचाही प्रयत्न केला. तशी विचारणा अनेकांकडून झाल्याचे गॅस एजन्सींमधून समजले. परंतु अशा गोष्टींना पुरवठादारांनी सक्त नकार देऊन त्यांचा गैरसमज दूर केला. सध्या वाहन सुविधा बंद असल्याने कामगार वर्गही कमी झाला आहे. याबाबत मुंबईतील भारत गॅसचे पुरवठादार सांगतात, सिलिंडर वाहून नेणारे अनेक कामगार मुंबई बाहेरून येतात. त्यामुळे संचारबंदीनंतर कामगारांचा तुटवडा आहे. त्यात लोकांनी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गर्दी केल्याने आमचीही तारांबळ उडाली आहे. शक्य तितक्या लोकांना घरपोच सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असेल. परंतु जे लोक रिकामे सिलिंडर घेऊन येतात, त्यांना आम्ही रीतसर पावती देऊन सिलिंडर देत आहोत, तर प्रभादेवी परिसरात जे ग्राहक स्वत: सिलिंडर घेऊन जात आहेत, त्यांना ७८० रुपयांचा सिलिंडर ७५० रुपयांत देऊ केला आहे. कामगारांची कमतरता असल्याने भूमिका घेतल्याचे समजते. टेम्पोच्या माध्यमातून इमारतींच्या, चाळींच्या दारापर्यंत सिलिंडर पोहोचवण्याची व्यवस्था करणार असल्याचेही प्रभादेवीतील पुरवठादारांनी सांगितले.

सहकार्य करा!

अनेक पुरवठादारांनी गर्दीतील लोकांना करोनाचे गांभीर्य लक्षात आणून देत गर्दी न करण्याचे आवाहन केले. तसेच वेळोवेळी ते पोलिसांचीही मदत घेत आहे. सिलिंडर मुबलक प्रमाणात आहेत, ते वेळेवर पोहोचवलेही जातील. फक्त जनतेने संयमी भूमिका दाखवण्याची गरज आहे, असे आवाहन गॅस पुरवठादारांनी केले आहे.