लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई :  शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात  पर्यावरणपूरक अशा  २६ वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाडय़ा दाखल झाल्या आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या या गाडय़ांमध्ये अपंग प्रवाशांसाठी खास लिफ्टची सोय उपलब्ध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून या बसगाडय़ांचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम टू‘ या उपक्रमांतर्गत  (फास्टर अ‍ॅडॉप्शन अँड मॅन्युफॅरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रीक वेहिकल्स) इलेक्ट्रीक बस योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत ‘फेम‘कडून बेस्टला ३४० बस गाडय़ा मंजूर झाल्या आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील २६  बसगाडय़ा बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. शुक्रवारपासून त्या प्रवाशांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत.

नरिमन पॉईंट येथे आयोजित लोकार्पण सोहळ्याला महापौर किशोरी पेडणेकर, पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्रकुमार बागडे आदी मान्यवर उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बसची पाहणी केली. त्यानंतर स्वत: या नवीन इलेक्ट्रीक बसमध्ये प्रवास केला.

टाटा मोटर्सने या बसगाडय़ा तयार केल्या असून देशातील पाच शहरांमध्ये २१५ विद्युत बसगाडय़ांचा पुरवठा केला आहे.

हिमाचल प्रदेश, चंदीगढ, आसाम व महाराष्ट्रात या बसगाडय़ांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बेस्ट परिवहन विभागात  स्वत:च्या मालकीच्या ६ व भाडेतत्त्वावरील ६६ अशा एकूण ७२ विद्युत गाडय़ा आतापर्यंत झाल्या आहेत.

प्रवाशांसाठी सुविधा

ल्ल टाटा मोटर्स कंपनीने बनवलेल्या या बसगाडय़ांमध्ये अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्याद्वारे बसमध्ये होणाऱ्या अनुचित घटनांवर देखरेख ठेवली जाणार आहे.

ल्ल अपंग प्रवाशांना चढण्या—उतरण्यात समस्या येऊ नये यादृष्टीने बस गाडय़ांमध्ये इलेक्ट्रीक लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लिफ्टचे तंत्रज्ञान हे अद्ययावत रॅम्प म्हणजेच उतारासारखे आहे.

ल्ल टाटा मोटर्स कंपनीने या बसगाडय़ा तयार केल्या असून प्रशस्त अंतर्गत रचना, मोबाईल चार्जिग पॉईंट, प्रवाशांसाठी वाय फाय सारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत.