सर्वामध्येच अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटने आता एक लोकप्रिय निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या संकेतस्थळावर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी असलेली १४० अक्षरांची मर्यादा जुलै महिन्यापासून १० हजार अक्षरांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. मात्र ही सुविधा फक्त थेट आणि खासगी संदेश पाठवणाऱ्यांसाठीच उपलब्ध असेल. सर्वसाधारण ट्विपण्णी करणाऱ्यांना मात्र आपले विचार आणि भावना १४० अक्षरांमध्येच मांडाव्या लागणार आहेत.
व्हॉट्सअॅप आणि फेसबूक मेसेंजर या दोन महत्त्वाच्या आणि लोकप्रिय अॅप्सवर आपल्या भावना मांडण्यासाठी अक्षरांचे बंधन नाही. ही दोन्ही अॅप्स खासगी संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी सर्वोत्तम म्हणून ओळखली जातात. त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी खासगी संदेशांच्या ‘अक्षर मर्यादे’बाबत ट्विटरने हा निर्णय घेतला आहे. मात्र हा मोठा संदेश वाचण्यासाठी आणि पाठवण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी काही वेळ जावा लागणार आहे. त्यामुळे ही सुविधा जुलैपासून उपलब्ध होईल. त्यासाठी वापरकर्त्यांना आपल्या उपकरणाच्या ‘एपीआय’ आणि ‘जीईटी’ अद्ययावत करावे लागणार आहेत. त्यानंतरच हा पूर्ण संदेश वाचता येणे शक्य होणार आहे.
विशेष म्हणजे ट्विटरचे सहसंस्थापक डिक कोस्टोलो यांनी आपल्या मुख्य कार्यकारी पदाचा राजीनामा दिला, त्याच दिवशी ही बातमी प्रसृत झाली आहे. ट्विटरच्या सुरुवातीच्या काळात हे पद सांभाळणारे सह संस्थापक जॅक डोरसे यांनी पुन्हा एकदा हा पदभार तात्पुरता स्वीकारला आहे. त्यानंतर या दहा हजार अक्षरांच्या मर्यादेची घोषणा झाल्यावर गुंतवणूकदारांनी या घोषणेचे स्वागत केले आहे. त्यामुळे ट्विटरच्या समभागांत तब्बल ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.