नीरव मोदी भारतातून ११ हजार कोटींचा चुना लावून पळाला, ललित मोदी पळाला एक मोदी आहेत येऊन जाऊन असतात. असा ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्यानंतर भाजपाने उत्तर दिले नसते तरच नवल वाटले असते. भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रभादेवीच्या गल्लीत काहींना मोदी या शब्दाशी यमक जुळवणारे काव्य काहींना सुचले. तेव्हाच कळले की शिमगा जवळ आला आहे. तसा वर्षभर यांचा शिमगाच असतो म्हणा. पण उगाच यमकासाठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल असा ट्विट आशिष शेलार यांनी केला आहे.

भाजपा आणि शिवसेना यांची सत्ता आली तेव्हापासूनच दोन्ही पक्षांतून विस्तव जात नाहीये. एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी हे दोन्ही पक्ष सोडत नाहीत तरीही सत्तेत एकत्र आहेत. नीरव मोदी पीएनबी बँकेला ११ हजार कोटींचा चुना लावून पळून गेला त्यावरून देशभरातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केलीच. पण शिवसेनाही त्यात मागे नाही.

शिवसेनेच्या मुखपत्रातून आजच नीरव मोदीलाचा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा असा खोचक सल्ला देण्यात आला. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी आडनावाचे यमक जुळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. ज्यानंतर चिडलेल्या आशिष शेलारांनी तसेच तिखट भाषेत उत्तर दिले आहे.