देवनार कचराभूमी आगप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. आग प्रकरणात हे दोघे मुख्य आरोपी असल्याचे बोलले जात असून भंगारचे मोठे व्यापारी असलेल्या या दोन्ही आरोपींमुळे कचराभूमीत आग लावण्यासाठी प्रोत्साहन मिळत होते. दोघांनाही शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
गेल्या चार महिन्यांत कचराभूमीला लागलेल्या आगीत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील मार्च २०१६ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्य़ात शिवाजीनगर पोलिसांनी मागील आठवडय़ात नऊ भंगार व्यापाऱ्यांना अटक केली होती. तपासात आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत होती. शनिवारी शिवाजीनगर पोलिसांनी दोन व्यापारी भावांना अटक केली. आतिक अहमद खान आणि रफीक अहमद खान अशी या व्यापाऱ्यांची नावे आहेत. दोघांचेही कचराभूमीजवळ भंगाराचा व्यापार असून कचराभूमीवर जगणाऱ्या मोठय़ा व्यापाऱ्यांपैकी ते मानले जातात. कचरावेचक मुलांना कचराभूमीतील कचऱ्यातील वस्तू जाळून त्यातून धातू मिळविण्यासाठी हे दोघे उद्युक्त करत असत.