नाकाबंदी करून दोघांना अटक

मुंबई : भर रस्त्यात वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवल्याने गाडीतील तिघांनी वाहतूक पोलिसाचेच घाटकोपरच्या छेडानगर परिसरातून मंगळवारी अपहरण केले. वाहतूक पोलिसाने तात्काळ ही माहिती वरिष्ठांना दिल्याने या दोन आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत टिळकनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

विकास मुंडे असे या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते चेंबूर वाहतूक विभागात कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते घाटकोपरच्या छेडानगर येथे आपले कर्तव्य बजावत होते. याच वेळी मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काही तरुण मद्यप्राशन करून गाडी भरधाव चालवत असल्याची माहिती काही वाहनचालकांनी मुंडे यांना दिली. मुंडे यांना ही गाडी दिसताच त्यांनी वाहनचालकास ती थांबवण्यास सांगितले. मात्र गाडी थांबवण्याऐवजी त्यांनी ती पुढे पळवण्याचा प्रयत्न केला. चालक गाडी थांबवण्यास तयार नसल्याने मुंडे गाडीमागे धावत कसेबसे त्या गाडीत बसले. तरीही चालकांनी गाडी पुढेच दामटवली.

गाडी थांबवण्यास चालक तयार नसल्याने मुंडे यांनी समयसूचकता दाखवत तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ मुख्य नियंत्रण कक्षाला माहिती दिल्याने रमाबाई कॉलनी परिसरातच वाहतूक पोलिसांनी ही गाडी अडवली. त्यानंतर मुंडे यांची सुटका करत पोलिसांनी गाडीमध्ये असलेल्या विराज शिंदे आणि गौरव पंजवाणी या दोघांना ताब्यात घेतले. गाडीत असलेल्या तिसऱ्या व्यक्तीने मात्र पोबारा केला.

शिंदे आणि पंजवाणी यांना टिळकनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात वाहतूक पोलिसांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.