कैलासनगरजवळ असलेल्या मामा-भाचे डोंगरामध्ये एकाची डोक्यात दगड घालून हत्या करणाऱ्या दोघांना वागळे इस्टेट गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी अटक केली असून यामध्ये मृताच्या पत्नीसोबत लग्नापूर्वी प्रेमसंबंध असलेल्या तरुणाचा समावेश आहे. मृताचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याने तो  पत्नीला त्रास देत होता, याच कारणावरून त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
संतोष ऊर्फ पिंटय़ा खरात (३०, रा. विरार) आणि विकास ऊर्फ गोटय़ा माळवे (२१, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना अटक करण्यात आली असून नावे संतोष हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मंगळवारी सकाळी ठाणे येथील कैलासनगरजवळील मामा-भाचे डोंगरामध्ये रमेश मारुती देठे (४०, रा. डोंबिवली) यांचा मृतदेह श्रीनगर पोलिसांना आढळला होता. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
देठे हे रेल्वेमध्ये नोकरीला होते. कळवा परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत त्यांचे संबंध होते. त्यामुळे ते पत्नी व मुलांना पैसे देत नव्हते तसेच त्यांना मारहाण करीत होते. दरम्यान, रमेश यांच्या पत्नीचे लग्नापूर्वी संतोषसोबत प्रेमसंबंध होते व ती त्याची दूरची नातेवाईक आहे. तिने रमेशबाबत त्याला सांगितले होते. त्याचा राग संतोषच्या मनामध्ये होता. त्यामुळे त्याने विकासच्या मदतीने रमेश यांना दारू पिण्याच्या बहाण्याने मामा-भाचे डोंगरामध्ये नेले. तेथे त्यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर संतोषने डोक्यात दगड घालून रमेश यांची हत्या केली, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.