लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने लावलेल्या सापळ्यात दोन पोलीसच लाच घेताना सापडले. पार्कसाइट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ गंब्रे आणि साकीनाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश दळवी अशी या लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.
पहिल्या प्रकरणातील फिर्यादीवर भायखळा येथे गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीचा एक मित्र इम्रान खान याने या प्रकरणात तडजोड करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ गंब्रे यांच्याशी भेट घालून दिली. गंब्रे यांनी तपास अधिकाऱ्यास एक लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून पैशांची मागणी केली होती. त्यामुळे फिर्यादीने लाचलुतपत खात्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुरुवारी भायखळा येथे सापळा लावून गंब्रे यांना १० हजार रुपये आणि तसेच इम्रान खान याला ५ हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत, साकीनाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश दळवी यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी पवई येथे अटक करण्यात आली. या प्रकरणातील फिर्यादीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात मदत करण्यासाठी दळवी यांनी फिर्यादी कडून दोन लाख रुपये घेतले होते. नंतर पुन्हा २० हजार मागितले. परंतु तेवढय़ावरही समाधान न झाल्याने दळवी यांनी पुन्हा ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पवई गार्डन येथील एल अँण्ड टी चौकीत सापळा लावून दळवी यांना २५ हजार रुपये घेताना अटक करण्यात आली.