सोने व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यासह चौकडीला अटक

केवळ चार रुपयांमुळे गेल्या आठवडय़ात पायधुनीत झालेल्या दोन कोटींच्या सोने चोरीची उकल झाली आहे. एका दुकानदाराला चिक्की खरेदीसाठी दहा रुपये दिल्यानंतर चार रुपये परत न घेणाराच या चोरीमागील प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. पायधुनी पोलीस ठाणे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

१७ सप्टेंबरला कर्नाक बंदर परिसरात उभ्या असलेल्या टॅक्सीत दोन अज्ञात व्यक्ती शिरले आणि त्यांनी दोन कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवी चोरून पोबारा केला. फिर्यादी मुकेश सिंघवी यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दोन कोटी रुपये किमतीच्या सोन्याची चोरी झाली असल्यामुळे गुन्हे अन्वेषण विभागही समांतर तपास करीत होते. परिमंडळ दोनचे उपायुक्त संदीप कर्णिक आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर सोने चोरी करणाऱ्या चौकडीला जेरबंद करण्यात आले. मात्र केवळ चार रुपयांमुळे ही उकल झाल्याचे कर्णिक आणि दहिकर यांनी सांगितले.

मुकेश सिंघवी हे नातेवाईक अंकित आणि कर्मचारी आकाश यांच्यासोबत सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली पिशवी घेऊन सीएसटी रेल्वे स्थानकाकडे टॅक्सीने चालले होते. शौचास जाण्याच्या बहाण्याने टॅक्सी कर्नाक बंदर येथे थांबविण्यात आली. त्या वेळी टॅक्सीवाला एका पानाच्या ठेल्यावर गेला आणि त्या शेजारी असलेल्या चिक्कीवाल्याकडे एक व्यक्ती चिक्की खात होती. चिक्कीसाठी त्याने दहा रुपये दिले. परंतु उरलेले चार रुपये घेण्याऐवजी तो घाईघाईत निघून गेला. ही बाब तपास पथकाला खटकली. सिंघवी यांच्याकडे काम करणाऱ्या प्रफुल्ल गायकवाड हा कर्मचारी एकाच क्रमांकावर अनेकदा बोलल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय चार रुपये न घेणारा व्यक्ती गायकवाडच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सोने चोरीची उकल झाली आणि चौकडीला अटक करण्यात आल्याचे कर्णिक आणि दहिकर यांनी सांगितले. वरिष्ठ निरीक्षक अशोक जाधव, प्रशांत राजे, नंदकुमार गोपाळे, भास्कर कदम तसेच संजय निकम, हृदय मिश्र आदींचा तपास पथकात समावेश होता.

  • मुकेश सिंघवी यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाइल क्रमांक मिळवून त्याच्या नोंदी पोलिसांनी तपासल्या.
  • त्यापैकी प्रफुल्ल गायकवाड हा कर्मचारी एकाच क्रमांकावर अनेकदा बोलल्याचे निष्पन्न झाले आणि संशय अधिकच बळावला.