गेल्या काही दशकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्म, जात, भाषा अशा बहुविध कोनांमधून करण्यात आलेले मूल्यमापन समकालीन संदर्भात तपासण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाकडून १० व ११ मार्चदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज- मतमतांतरे व वादचर्चा’ या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवाजी महाराज आणि त्यांचा समकालीन इतिहास व वारसा हा महाराष्ट्र आणि जगभरातील अनेकांच्या प्रेरणेचा, अस्मितेचा व पर्यायाने वादाचाही विषय राहत आला आहे. शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने मराठी व महाराष्ट्र यांच्या संदर्भातील इतिहासावर अभ्यासक, राजकारणी व सामान्य जनांमध्येही चर्चा, मतमतांतरे व्यक्त केली जात असतात. एकीकडे महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली शिवजयंती, महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांवर लिहिलेला पोवाडा येथपासून ते स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ व त्यानंतर झालेली शिवसेनेची स्थापना व तिचे राजकारण या सर्व कालखंडात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अन्वयार्थ अनेक प्रकारे लावला गेला, तर दुसऱ्या बाजूला जदुनाथ सरकार, शरद पाटील यांच्यासारख्या इतिहासकारांनी तसेच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनीही आपले वेगळे आकलन मांडले आहे. याचे पडसादही सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणावर पडलेले आहे.

या परिसंवादाचे उद्घाटन गुरुवारी, १० मार्चला ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे अध्यक्ष श्री. मा. भावे यांच्या बीजभाषणाने होणार आहे. या परिसंवादात एकूण २६ सत्रे होणार आहेत.

परिसंवाद कधी :  १०, ११ मार्च

कुठे :  फिरोझशाह मेहता भवन, विद्यापीठाचे कलिना संकुल.

अधिक माहिती : ९७०२८३३१२९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सहभाग :  डॉ. अरुणा पेंडसे, डॉ. सोनाली पेडणेकर, डॉ. प्रकाश परब, डॉ. दत्ता पवार, डॉ. उत्तरा सहस्रबुद्धे, नीरज हातेकर, सुहास बहुलकर आदी अभ्यासक परिसंवादात विचार मांडणार आहेत.