हिट अॅंड रन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानला तात्पुरता दिलासा देताना त्याला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. सलमान खानच्या जामीन अर्जावर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यावेळी जामीन अर्जावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. जामीन अर्जावर अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत सलमान खानला अटक करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने पोलीसांना दिले आहेत.
स्थगिती मिळवण्यासाठी सलमान खानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी बुधवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर दुपारी साडेचार वाजता अंतरिम सुनावणी घेण्यात आली. अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे सलमान खान तूर्त अटक होणार नाही.
१३ वर्षांपूर्वीच्या हिट अॅंड रन प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमान खानला दोषी ठरवित त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. नियमानुसार, तीन वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्यावर दोषी व्यक्तीकडून त्याच न्यायालयात जामीनासाठी अर्ज करता येतो. मात्र, त्यापेक्षा मोठी शिक्षा सुनावण्यात आल्यावर दोषी व्यक्तीला वरिष्ठ न्यायालयात जामीनासाठी अर्ज करावा लागतो. सलमान खानच्या प्रकरणात त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे त्याला जामीनासाठी उच्च न्यायालयात जावे लागले.
येत्या १० मे पासून उच्च न्यायालयाची उन्हाळी सुटी सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आठ तारखेला त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्यामुळे त्याला अटक होणार की नाही, हे त्या दिवशीच स्पष्ट होईल.