विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे वाडा तालुक्याच्या वरले गावातील कातकरी पाडय़ातील दोघे मृत्युमुखी पडले असून पाच जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कातकरी पाडय़ालगत एका लहान तलावाचे दूषित पाणी विहिरीत झिरपत असून या विहिरीचेच पाणी कातकरी पाडय़ातील नागरिक पिण्यासाठी वापरतात. या विहिरीत प्रमाणापेक्षा अधिक टीसीएल पावडर टाकली जात असल्याने पाणी दूषित झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शनिवारी  अक्षय जाधव (११  या बालकाला रक्ताच्या उलटय़ा होऊन त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर याच पाडय़ातील अंजनी मुकणे (५५) या महिलेचाही रक्ताच्या उलटय़ा होऊन मृत्यू झाला. विजय टबले (२४), दिनेश सावंत (१० ), संदीप वाघ (११)  या तिघांनाही उलटय़ांचा त्रास होऊ लागला. पाडय़ाशेजारी राहणाऱ्या सुलभा कान्हात (३९) आणि प्रियंका कान्हात या मायलेकींनाही उलटय़ा सुरू झाल्या. त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.