चेंबूरच्या सिंधी कॉलनीमधील एका इमारतीत दोन वयोवृद्ध महिलांचे मृतदेह सापडल्याने गुरुवारी दुपारी खळबळ उडाली. दोन्ही महिला सख्ख्या बहिणी असून दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. गुरुवारी घरातून दरुगधी येत असल्याची माहिती इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कळविली होती.
पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दार तोडल्यानंतर बहिणी मृतावस्थेत आढळल्या. दोन वर्षांपूर्वी भावाचा मृत्यू झाल्यानंतर या बहिणींनी आपले जीवन संपविले असण्याचा प्राथमिक अंदाज चेंबूर पोलिसांनी वर्तवला आहे. परंतु, एका महिलेच्या डोक्याला जखम झाल्याने तिचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. तर दुसऱ्या बहिणीचा त्या धक्क्याने मृत्यू झाला असावा, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोहिनी जेठवानी (७२) आणि बसंती जेठवानी (७५) अशी या बहिणींची नावे आहेत.