एकूण २२ लाख रुपयांच्या भरपाईचे आदेश

मुंबई : वैद्यकीय निष्काळजीच्या दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये राज्य ग्राहक आयोग आणि जिल्हा ग्राहक मंचाने मुंबईतील दोन नामांकित रुग्णालये आणि त्यांतील नऊ डॉक्टरांना दोषी ठरवले आहे. त्यांना एकूण २२ लाख रुपयांच्या भरपाईचे आदेश देण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात राज्य ग्राहक आयोगाने पवई येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयाला आणि त्यातील दोन डॉक्टरांना मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त ७३ वर्षांच्या महिलेच्या २००५ साली झालेल्या मृत्यूप्रकरणी दोषी ठरवले. त्यांच्या मुलींना १६ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. सरस्वती कोटीस्वरन या २००५ पासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. मात्र त्यांना नेमका काय आजार आहे हे शोधण्यास विलंब झाला. विशेष म्हणजे चुकीच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे त्यांचा तपास करण्यात आला. परिणामी योग्य उपचारांअभावी सरस्वती यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे आपल्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत सरस्वती यांच्या दोन मुलींनी आधी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. तिथे निराशाच पदरी पडल्यानंतर त्यांनी राज्य ग्राहक आयोगाकडे अपील केले. आयोगाने मात्र जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या चुकांवर बोट ठेवले.

ग्राहक न्यायालयाने सरस्वती यांचा मूळ वैद्यकीय अहवाल विचारातच घेतला नसल्याचा ठपका ठेवला. त्या नऊ दिवस रुग्णालयात होत्या. त्यातील पाचहून अधिक दिवस त्यांना सतत प्रतिजैविके दिली गेली. चुकीच्या सोनोग्राफीच्या अहवालाद्वारे निदान करण्यास विलंब झाला. परंतु या सगळ्याचा विचार न करताच ग्राहक न्यायालयाने तक्रार फेटाळून लावली, असे नमूद करीत आयोगाने ग्राहक न्यायालयाचा निकाल रद्द केला. आयोगाने रुग्णालयातील क्ष-किरणतज्ज्ञ आणि चिकित्सक यांच्यासह रुग्णालयाला १६ लाख रुपये भरपाई तक्रार दाखल झाल्यापासून नऊ टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले आहेत.

दुसऱ्या प्रकरणात जिल्हा ग्राहक न्यायालयाने बॉम्बे रुग्णालय आणि तेथील सात डॉक्टरांना वैद्यकीय निष्काळजीच्या आरोपांत दोषी ठरवले. कुलाबा येथील ५३ वर्षांच्या महिलेला गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांच्या आतच तिला हेपेटायटिस-सी झाल्याचे उघड झाले. २००७ मध्ये या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेच्या वेळी र्निजतुक उपकरणे वापरली न गेल्यानेच या महिलेला हेपेटायटिस-सी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट करीत जिल्हा न्यायालयाने रुग्णालय आणि डॉक्टरांना वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दोषी ठरवले. डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यांचे आर्थिक नुकसान होण्यासह कुटुंबीयांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यांचे आरोग्य, वैवाहिक जीवन आणि करिअरवरही या आजारपणाचा परिणाम होणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.